मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 556 घरांच्या चाव्या मार्च महिन्यापर्यंत दिल्या जाणार आहेत. यात इमारत क्रमांक 1 च्या डी आणि ई विंगमधील घरांचा समावेश आहे. त्यामुळे 160 फुटांच्या घरात राहणारे बीडीडीवासीय थेट 45 मजल्याच्या टॉवरमधील 500 चौरस फुटांच्या घरात राहायला जाणार आहेत.
मुंबईतील वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून राज्य सरकार करत आहे. त्यासाठी अंदाजे 20 हजार कोटींचा खर्च येणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला मोठी गती देण्यात आली होती. मुंबईत सध्या 207 बीडीडी चाळी आहेत. यापैकी वरळीत 121, नायगावमध्ये 42, ना. म. जोशी मार्ग 32 तर शिवडीत 12 चाळी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. वरळीसह नायगाव फेज एकचे बांधकाम सुरू असून ना. म. जोशी मार्ग येथे 10 बीडीडी चाळींचे पाडकाम करण्यात आले आहे. शिवडीमध्ये जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू होणार आहे.
z वरळीत पहिल्या टप्प्यात 5198 घरांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय म्हाडा उपलब्ध होणाऱ्या जागेत 1 हजार 860 घरे मध्यम वर्ग उत्पन्न गटासाठी तर 1 हजार 36 घरे उच्च उत्पन्न गटासाठी बांधणार असून लॉटरीद्वारे त्याची विक्री होणार आहे.
z वरळी येथील पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात 3 हजार 974 घरांची बांधणी केली जाईल. म्हाडाला या ठिकाणी 2 हजार 184 घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यात 1 हजार 494 मध्यम उत्पन्न गट तर 1 हजार 36 उच्च उत्पन गटासाठी असणार आहेत.