दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी बलात्कार आणि ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीला अटक झाली. सध्या तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलगी ही 17 वर्षांची असून ती बारावीची विद्यार्थिनी आहे. पूर्व उपनगरात राहणाऱया मुलीचे नातेवाईक भेंडीबाजार परिसरात राहतात, तर आरोपी तरुणीदेखील त्याच परिसरात राहते. मुलगी नातेवाईकांकडे येऊन-जाऊन असल्याने तिची त्या तरुणीसोबत ओळख होती. दरम्यान, दोघींमध्ये बोलणे वाढले, मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हा प्रकार मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी तिला गावी पाठवले. काही दिवस गावी राहिल्यानंतर ती पुन्हा मुंबईत परतली व पालकांसोबत राहू लागली. डिसेंबर महिन्यात तरुणीने मुलीला संपर्क साधला आणि मुलीला भेटण्यास बोलावले. दोघींनी सिनेमा पाहिला आणि मग पळून जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे दोघी 6 जानेवारीला पळून गेल्या. मुलगी घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध करून अखेर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
विरारच्या रिसॉर्टमध्ये सापडल्या
पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेतला असता दोघी विरारमधील एका रिसॉर्टमध्ये असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथे जाऊन दोघींना ताब्यात घेऊन मुंबईत आणले. दोघींमध्ये जे घडले ते समोर आल्यानंतर तरुणीवर बलात्कार व ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. दोन दिवस त्या हॉटेलमध्ये थांबल्या, तर तीन दिवस एका भाडय़ाचे घर घेऊन राहिल्या होत्या.