ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो हा नवीन अंक पाहायला मिळत आहे. आम्ही तुमचा सन्मान करतो, पण स्वत:ची चूक झाकण्यासाठी कुणालाही डिवचू नका. तुमच्याकडून चूक झाली आणि त्यातून एका समाजाला बाजूला नेण्याचे काम झाले, असे प्रत्युत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांच्या मस्साजोग येथील घटनेबाबत केलेल्या वक्तव्याला दिले.
जरांगे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटमध्ये उपचार घेत आहेत. मस्साजोग प्रकरणावर नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की, न्यायाचार्यांकडून जातीय सलोखा बिघडायला नको होते, पण धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीवादाचा चौथा अंक पाहायला मिळाला. आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले म्हणून जातीवादाचा हा अंक भयंकर असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला रक्त पट्टी दिसली, सलाईन पाहून मरावं वाटलं असं तुमचं वक्तव्य, पण संतोष देशमुख यांचे रक्त दोन-अडीच महिने कोणाला दिसले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आमदार नरेंद्र पाटील यांना प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले की, जातीचा विश्वासघात केल्यावर मी मागे लागत असतो. दिल्लीकडून दखल घेतली जात असेल तर आम्ही वाट बघतोय. अनेक दशकांनंतर मराठा एकत्र आला आहे. आता वेगळा होणार नाही. मराठा समाजासाठी मला जसं आंदोलन करता येईल, ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल, असे ते म्हणाले. छगन भुजबळांविषयी ते म्हणाले की, त्यांनी माझ्या नादाला लागू नये, समजून घ्या, शहाणे व्हा, मला खेटू नका, असे जरांगे म्हणाले.