पुण्यासह दिल्ली, मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून स्वदेशी बनावटीची ‘एअर टॅक्सी’ सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 2026 पर्यंत या सुविधेची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात येईल, असे केंद्रीय नागरी हवाईमंत्री किंजीरापू राममोहन नायडू यांनी सांगितले.
विमानासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि विविध घटकांचे भारतात 35 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन होत आहे. यामध्ये हेलिकॉप्टरसाठी लागणारी उपकरणेदेखील तयार केली जात आहेत. ‘एअर टॅक्सी’ तयार करण्याच्या दृष्टीने सरकारकडून पावले उचलण्यात आली असून 2026 पर्यंत चाचणी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे नायडू म्हणाले.
देशात पुढील पाच वर्षांत
50 विमानतळे नव्याने निर्माण करण्यात येणार असून नोएडा आणि नवी मुंबई येथील विमानतळांचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे ते म्हणाले.