राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या वतीने आयुर्वेदातील शिक्षक, पदव्युत्तर आणि पदवीधरांसाठी पतंजली आयुर्वेद महाविद्यालयाच्या अंतर्गत सहा दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम ‘चरकायतन’ आयोजित करण्यात आला होता. आज या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘आयुर्वेदाशी जोडण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्य आहे. आयुर्वेद हे केवळ उपजीविकेचे साधन नसून ऋषीमुनींच्या ऋणातून मुक्त होण्याचाही एक मार्ग आहे,’ असे त्यांनी सांगितले. कुलगुरू पुढे म्हणाले की, आयुर्वेद तुमच्या वागण्यात, आचरणात, स्वभावात व जीवनात दिसला पाहिजे. स्वतःला वैद्य म्हणवून घेण्यात अजिबात संकोच नसावा. याउलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे.