छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल-2च्या पार्पिंगमध्ये आज सकाळी धक्कादायक घटना घडली. वेगात असलेल्या मर्सिडीज कारने पाच जणांना धडक दिली. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दोन परदेशी नागरिक असून अन्य तिघे क्रू मेंबर आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे पार्पिंग परिसरातदेखील गाडय़ांची मोठय़ा संख्येने ये-जा होत असते. आज सकाळी 8.30 च्या सुमारास नवी मुंबईतून एक टुरिस्ट मर्सिडीज कार विमानतळावर आली होती. मात्र पार्किंग परिसरात कारचालक परशुराम दादनवले (34) याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने तेथे असलेल्या पाच जणांना धडक दिली. त्यात जखमी झालेल्या दोघा परदेशी नागरिकांना तत्काळ नानावटी इस्पितळात नेण्यात आले. एकाच्या गुडघ्याला तर दुसऱयाच्या मांडीला दुखापत झाली. तसेच जमखी तिघा क्रू मेंबरर्सना कुपर इस्पितळात नेण्यात आले. दोघांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. तर तिसऱया इसमाच्या पायाला प्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार आणि चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून परशुराम याला अटक केली. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. पोलीस अधिक तपास करीत आहेत.