पतीला 10 लाखांना किडनी विकण्यास केलं प्रवृत्त, पैसे मिळताच प्रियकरासोबत महिला पसार

पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील हावडा जिल्ह्यातील संकरेलमधील एका महिलेने तिच्या पतीला 10 लाख रुपयांना किडनी विकण्यास प्रवृत्त केलं. यानंतर पतीची किडनी विकून मिळालेले पैसे घेऊन ही महिला आपल्या प्रियकरासोबत पसार झाली.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, महिलेने पतीवर तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी दबाव आणला होता. किडनी विकून पैसे मिळवण्यासाठी ती गेल्या अनेक महिन्यांपासून पतीवर दबाव टाकत होती. यासाठी ती पतीशी भांडतही होती. अखेर पतीने आपल्या मुलीला आणि कुटुंबाला आर्थिक मदत होईल हा विचार करून किडनी विकण्यास होकार दिला. मात्र पतीला त्याच्या पत्नीच्या हेतूची कल्पना नव्हती. किडनी विकून पतीला 10 लाख रुपये मिळताच, सगळे पैसे घेऊन ही महिला आपल्या प्रियकरासोबत पसार झाली.

पीडित पती त्याची किडनी विकून कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याची योजना आखत होता. पण त्याच्या पत्नीने तिच्या भविष्यासाठी वेगळ्याच योजना आखल्या होत्या. पत्नी पळून गेल्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करून दोघांनाही शोधून काढले. यानंतर पती आपल्या 10 वर्षांच्या मुलीसह बराकपूरला पोहोचला, जिथे त्याची पत्नी प्रियकरासोबत राहत होती. पती आणि मुलगी तिथे पोहोचल्यानंतर महिलेने घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. महिलेने आपल्या पतीला धमकावत त्याला वाटेल ते कर, असे सांगितले. महिलेने सांगितले की, ती लवकरच त्याला घटस्फोट देईल.

दरम्यान, हिंदुस्थानात 1994 पासून मानवी अवयवांची विक्री बेकायदेशीर आहे. मात्र डोनर्सची कमतरता असल्याने बेकायदेशीरपणे मानवी अवयवांची विक्री छुप्या पद्धतीने अद्यापही सुरु आहे. पोलीस यावर कारवाई करत आहेत.