सध्या देशात कामाचे तास आणि आठवड्याच्या सुट्ट्या यावरून चर्चा सुरू आहे. यावर प्रत्येकजण आपापले मत मांडत आहे. कामाच्या तासांपेक्षा कामाच्या दर्जाला महत्त्व देण्याचे मतही अनेकांनी मांडले आहे. तसेच जगभरात काही देशांनी फक्त चार दिवसांचा आठवडा जाहीर करत कर्मचाऱ्यांना तीन दिवस आठवड्याची सुटी जाहीर केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना घरासाठी, कुटुंबीयांसाठी, छंदासाठी वेळ देता येतो आणि त्यामुळे त्यांचे कामकाज सुधारते, असे मत कंपनीने म्हटले आहे. आता एका व्हायरल पोस्टने या वादात आगीत तेल ओतले आहे.
लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना रविवारसह आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे याबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. आता सॅन फ्रान्सिस्कोमधील एका टेक कंपनीचे सह-संस्थापक वरुण वूमडी यांनी भारतीय अभियंत्यांच्या कार्यसंस्कृतीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणतात की भारतीय अभियंते चांगले पगार मिळत असूनही आठवड्यातील सहा दिवस काम करण्यास तयार नसतात. कंपनीच्या भारतीय शाखेत अभियंत्रे मिळणे कठीण होत आहे. बहुतेक अभियंते आठवड्यातून सहा दिवस काम करण्यास तयार नाहीत. त्यांना १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक पगाराची ऑफर दिली गेली तरीही त्यांना पाच आठवड्यांचाच आठवडा असलेली नोकरी करायची असते. 1 कोटी रुपये पगार मिळत असूनही 3 ते 8 वर्षांचा अनुभव असलेले अभियंते आठवड्यातून सहा दिवस काम करण्यास नकार देतात, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी अभियंत्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळे प्राधान्यक्रम असतात. तुम्ही पैशाने लोकांना खरेदी करू शकत नाही. ते पैशाचा आदर करतात, पण त्याची पूजा करत नाहीत. तसेच कामाच्या तासापेक्षा दर्जाही महत्त्वाचा आहे. तुम्ही कोट्यवधींचा पगार द्याल. मात्र, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तीक आयुष्यासाठी, कुटुंबीयांसाठी वेळच देता येणार नाही, असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
वूमडी यांच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा कामाच्या तासांबाबत चर्चा होत आहे. उच्च पगार की पाच दिवसांचा आठवडा अशी चर्चा सुरू आहे. अनेकजण कामांच्या तासांपेक्षा कामाच्या दर्जाला प्राधान्य देत असून स्वतःसाठी, कुटुंबीयांसाठी वेळ देणे महत्त्वाचे मानतात, असे दिसून येत आहे.