Budget 2025- देशावर फक्त कर्जाचा भार, 24 टक्के महसूल कर्जातून; तृणमूलचे खासदार साकेत गोखले यांची टीका

हिंदुस्थानवर कर्जाचा भार वाढला आहे, 24 टक्के महसूल हा कर्जातून येतो अशी टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी केली. तसेच महागाई आणि बेरोजगारीमुळे हे कर्ज काढावे लागत आहे असेही गोखले म्हणाले.

गोखले यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, 2025 च्या अर्थसंकल्पानुसार 24 टक्के महसूल हा कर्ज घेतल्यामुळे मिळतोय. जेव्हा खर्च करण्याची वेळ येते तेव्हा 20 टक्के रक्कम ही या कर्जाचे व्याज फेडण्यात जाते. 24 टक्के कर्ज आणि त्यावर 20 टक्के व्याज फेडण्यातच जातं. हे म्हणजे जुनं कर्ज फेडण्यासाठी आपण नवीन कर्ज घेत आहोत. सरकारचा महसूल कमी झाला आहे, कारण लोकांकडे खर्च करायला पैसेच नाही. बेरोजगारी आणि गगनाला भिडलेल्या महागाईचा हा परिणाम आहे.

2025 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी दोन गोष्टींकडे पूर्णपणे दूर्लक्ष केले ते म्हणजे बेरोजगारी आणि महागाई. 2025 चा अर्थसंकल्प काहीच कामाचा नाही, जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर काल अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर बाजारात काय अवस्था होती हे पाहा असेही गोखले म्हणाले.