आजकालच्या धावत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा सतत चुकतात. कामासाठी तासनतास बाहेर राहावे लागत असल्याने बाहेरचे अन्नपदार्थ, फास्टफुड आपण खातो. तसेच अपूर्ण झोप, बिघडलेल्या दिनक्रमाचा सगळ्यात जास्त पोटावर परिणाम होत असतो. यातूनच मग पित्त, अॅसिडिडी, गॅसेस ( acidity, gas )होणं यांसारख्या गोष्टी वारंवार जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत होतात. वारंवार गॅस होण्यामुळे अनेकदा आपल्याला नकोसे होते. यावरच आपण पाहणार आहोत काही खास घरगुती टिप्स ( Tips ).
ओवा सोबत हवा
आपल्या प्रत्येकाच्या घरात ओवा हा असतोच. तुम्हाला जर पोटात मुरडा आल्यासारखे वाटत असेल तर हातावर ओवा थोडा रगडून तुम्हाला तो खायचा आहे. ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे तुम्हाला छान आराम मिळेल. ओवा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या सोबत सहज कुठेही जाताना बाळगू शकाल.
जेवणानंतर गुळाचे करा सेवन
जेवणाच्या बदललेल्या वेळा यामुळे अन्नपचन होत नाही. पूर्वी लोक जेवल्यानंतर शतपावली करायचे. मात्र आता लोकांकडे वेळच नसल्याने घरी गेल्यावर जेवून कधी झोपतो असं होतं. तेंव्हा दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खाल्ल्याने अन्न पचनास आणि परिणामी संबंधित त्रासातून सुटका होण्यास मदत होते. गुळ तोंडात विरघळेपर्यंत चघळत राहावा ही प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल.
लिंबासह आल्याचेही फायदे
बऱ्याचवेळा पोटाच्या विकारांसाठी काळा चहा लिंबू पिळून घेतला जातो. त्यामुळे निश्चित फरक पडतो, मात्र जर चहात लिंबासोबत आलेदेखील टाकल्यास त्याचा अधिक लाभ होतो. त्याच बरोबर तुम्ही नुसते आल्याचे तुकडे चोथा होईपर्यंत चघळले, त्याचा रस प्यायल्यास आणि त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला आराम मिळू शकेल. यातून बद्धकोष्टतेचा त्रास देखील कमी होतो.
बडीशेपचे सेवन देईल आराम
जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप किंवा पान खाल्याने अन्नाचे चांगले पचन होते. 1 कप उकळलेल्या पाण्यात 1 चमचा बडीशेप मिसळून रातभर ठेवून द्या. सकाळी ते गाळून आणि त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावं. हे पाणी दिवसभरात 3 वेळा प्यायल्यानं पोट फुगणं आणि गॅसची समस्या दूर होते.