बाईकर्सना वाचवण्याच्या प्रयत्नात एसयूव्हीची डिव्हायडरला धडक, पाच भाविकांचा मृत्यू

स्टंटबाजी करणाऱ्या बाईकर्सना वाचवण्याच्या नादात एसयूव्ही कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच नेपाळी भाविकांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मधुबनी बायपासवर हा अपघात घडला. सर्व भाविक कुंभमेळ्याहून नेपाळला परतत होते.

अर्चना ठाकूर, इंदू देवी, मंतर्नी देवी, बाळकृष्ण झा आणि देवर्तन देवी अशी मयत भाविकांची नावे आहेत. चार जण जखमी असून त्यांना उपचारासाठी श्री कृष्णा मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. नेपाळच्या प्रशासनाला अपघाताची माहिती देण्यात आली असून मृत आणि जखमींच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सर्वजण प्रयागराज येथे कुंभमेळ्याला गेले होते. तेथून परतत असताना मधुबनी बायपास मार्गावर काही विद्यार्थी बाईकस्टंट करत होते. या बाईकर्सना वाचवण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरवर धडकून पाच वेळा उलटली. यात भाविकांचा मृत्यू झाला.