अर्थ मंत्र्यांनी मधुबनी पेंटिंगची साडी नेसली होती. 2 महिन्यांपूर्वी बिहारमध्ये राहणाऱया पद्मश्री विजेत्या दुलारी देवी यांनी निर्मला सीतारामन यांना ही साडी भेट दिली होती. बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्र्यांच्या साडीची चर्चा संसदेत रंगली. अर्थ मंत्री घरातून थेट राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. येथे त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची परवनगी घेतली. राष्ट्रपतींनी परंपरेनुसार शुभकार्याआधी त्यांना दही आणि साखर भरवून त्यांचे स्वागत केले.
यंदा शायरीपेक्षा थेट बोलण्यावर भर
अर्थ मंत्र्यांनी 2019मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकाळात अर्थसंकल्प सादर करताना शायरीने सुरुवात केली होती. प्रसिद्ध शायर मंजूर हाशमी यांच्या शायरीच्या दोन ओळी त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. त्यानंतर मात्र त्यांनी कुठल्याही अर्थसंकल्पात शायरीचा वापर केला नाही.
70 मिनिटांचे भाषण, 5 वेळा प्यायल्या पाणी
अर्थ मंत्र्यांनी 70 मिनिटांचे भाषण केले. 11.01 मिनिटांनी त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. 1 तास 17 मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी, 11 वाजून 27 मिनिटांनी, 11.44,11.56 आणि 12 वाजून 16 मिनिटांनी असे 5 वेळा पाणी पिले.
आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री
सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थ मंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अर्थ मंत्री असताना सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांनी 1959-1964 या काळात पाच वेळा वार्षिक आणि एकदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. दरम्यान, सीतारामन यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर करणाऱया मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदंबरम आणि यशवंत सिन्हा या अर्थ मंत्र्यांनाही मागे टाकले.