पुनर्बांधणीच्या नावाखाली विलेपार्ले पूर्व छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील शौचालय जमीनदोस्त करण्यात आले आहे. दोन महिने उलटून गेले तरी एकही वीट येथे रचली गेलेली नाही. संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे परिसरातील रहिवाशांची गैरसोय होत आहे. लवकरात लवकर या शौचालयाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने के-पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली.
विलेपार्ले पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरात साधारण दीड ते दोन हजार लोकवस्ती आहे. येथे पूर्वी 22 आसनी शौचालये होती. या शौचालयांच्या पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ 1 डिसेंबर रोजी करण्यात आला. त्यासाठी शौचालय जमीनदोस्त करून लोकांसाठी आठ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. इतक्या मोठय़ा लोकवस्तीसाठी तात्पुरत्या शौचालयांची संख्या अपुरी पडत आहे. तसेच दोन महिने उलटून गेले तरी शौचालयाची एक वीटही अद्याप रचली गेलेली नाही. संथगतीने सुरू असलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी शिवसेना शाखा क्र. 84च्या वतीने 26 जानेवारी रोजी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
सांताक्रुझ कलिना येथे सार्वजनिक शौचालय बांधायला उशीर करणाऱ्या महापालिकेवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच ताशेरे ओढले होते. शौचालय बांधत नसाल तर नागरिकांना तुमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये शौचासाठी पाठवू, असा सज्जड दमच न्यायालयाने दिला होता.
…अन्यथा वॉर्डवर टमरेल मोर्चा काढू!
नुकतेच शिवसेनेच्या वतीने के-पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. इतक्या मोठय़ा लोकवस्तीसाठी तात्पुरत्या शौचालयांची संख्या वाढवण्यात यावी तसेच पुनर्बांधणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना पंत्राटदाराला द्याव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. शौचालयाच्या पुनर्बांधणीचे काम वेळेत सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने के-पूर्व कार्यालयावर टमरेल मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी दिला. या वेळी शाखाप्रमुख प्रकाश सपकाळ, युवासेना चिटणीस आनंद पाठक, उपशाखाप्रमुख संदीप पेडणेकर, दीपक तळेकर, गणेश रहाटे, नितेश गुरव आदी उपस्थित होते.