धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असे प्रशस्तिपत्र न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी दिल्यामुळे देशमुख कुटुंबाच्या जखमेवरची खपली निघाली. न्यायाचार्य, मदतीची भाषा करूच नका, आम्हाला न्याय द्या, अशी भळभळती जखम घेऊन देशमुख कुटुंब रविवारी भगवानगडावर जाणार असून संतोष देशमुखांच्या हत्येचे सर्व पुरावे शास्त्री यांना देणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी, वाल्मीक कराड गँग, बोगस कामे करून बिले उचलणे आदी मुद्दय़ांवरून चोहोबाजूने कोंडी झालेले धनंजय मुंडे हे गुन्हेगारच नाहीत, असा निवाडा भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी काल केला. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणाऱ्यातले नेते नाहीत, असेही ते म्हणाले. गडावर राजकारण न करण्याची शपथ मोडून धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांची मानसिकताही बघितली पाहिजे, त्यांनाही मारहाण झाली होती. त्यातूनच पुढील सगळा प्रकार घडला, असा दिव्य साक्षात्कारही शास्त्री यांना झाला होता. नामदेव शास्त्री यांच्या या बदललेल्या भूमिकेवरून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनीही नामदेव शास्त्री यांच्या निवाडय़ावर नाराजी व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 28 मेपासूनचे सर्व पुरावे घेऊन आम्ही देशमुख कुटुंब आणि मस्साजोगचे ग्रामस्थ रविवारी भगवानगडावर जाणार आहोत. संतशिरोमणी भगवानबाबांचे दर्शन घेऊन आम्ही हे सर्व पुरावे न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांना दाखवणार आहोत. नामदेव शास्त्री यांनी मदत देण्याची तयारी दाखवली आहे. आम्हाला भगवानगडाकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही, आम्हाला फक्त न्याय हवा आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले. धनंजय मुंडे यांनी फक्त एकच बाजू नामदेव शास्त्री यांना सांगितली असावी. आम्ही संपूर्ण घटनाक्रम, त्याचे पुरावे शास्त्री यांना देणार आहोत. त्यावर नामदेव शास्त्री काय बोलतात हे बघणे महत्त्वाचे आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.
शास्त्रीजी, संतोष देशमुखांचे हाल दिसले नाहीत का?
भगवानगडावर जाताना धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडली. हॉटेल सनराईजमध्ये डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले. त्यानंतर मुंडे हे भगवानगडावर मुक्कामी गेले. सलाईन देण्यासाठी लावलेल्या सुईच्या जागेवर कापसाचा बोळा होता. त्यावरील रक्ताचा थेंब पाहून नामदेव शास्त्री हळहळले. संतोष देशमुख यांचे कसे हाल हाल केले, त्यांच्या अंगावर किती व्रण होते, शरीरातील रक्त कसे साकळले होते. शवविच्छेदन अहवालात हे सगळे आले आहे. यावर न्यायाचार्यांचे काय म्हणणे आहे, असा सवालही देशमुख यांनी केला.
गावच आमचे पाठीराखे, आम्हाला तुमची मदत नको
भगवानगडाने संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. पण आम्हाला या मदतीची गरज नाही. आम्हाला न्याय पाहिजे. संकटात संपूर्ण गाव आमच्या पाठीशी उभा राहिला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक धीर देण्यासाठी येत आहेत. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.