महागाई गगनाला भिडलेली असताना आजपासून मुंबईकरांचा खिसा रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या रूपाने आणखी रिकामा झाला आहे. आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागला. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात किलोमीटरमागे 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर कूल कॅबच्या दरात 8 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आजपासून अधिक आर्थिक भार सोसावा लागणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडय़ात वाढ करण्याला मंजुरी देण्यात आली. नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे. प्रस्तावित दरानुसार रिक्षाचे भाडे 11 टक्के आणि टॅक्सीचे भाडे 10 टक्क्यांनी वाढले आहे. तर कूल पॅबच्या भाडय़ातही 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
अशी आहे भाडेवाढ
- काळी-पिवळी मीटर टॅक्सीचे भाडे प्रति दीड किलोमीटरसाठी 28 रुपयांवरून 31 रुपयांवर गेले आहे.
- कूल पॅबसाठी प्रति दीड किमीचे भाडे 40 वरून 48 रुपयांवर गेले आहे.
- ऑटोरिक्षासाठी (सीएनजी) प्रति दीड किलोमीटर भाडे 23 वरून 26 रुपये इतके झाले.