कुंभमेळ्याला गेलेल्या रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीला अपघात, तिघे ठार; एक गंभीर जखमी

रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला घराकडे परतत असताना अपघात झाला. या भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक येथे घडली आहे. त्यामध्ये एकाची प्रकृती गंभीर तर आणखी तिघेजण किरकोळ जखमी झाले आहे. या भीषण अपघातात मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे माजी सरचिटणीस आणि निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई, कारचालक भाग्यवान झगडे व अक्षय निकम यांचे दुर्दैवी निधन झाले.

हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे शनिवारी पहाटे 4 वाजता घडला आहे. कुंभमेळा आटपून घरी रत्नागिरीकडे येत असताना नाशिकमधील मार्गावर सिन्नर येथे समोरून येणाऱ्या डंपरने कारला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कार गाडीचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

या अपघातात रत्नागिरीतील डी.ए़ड. कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई (रा. खेडशी रत्नागिरी) वाहन चालक भाग्यवान झगडे (रा. खेडशीनाका) व अर्थव निकम यांचे दुर्दैवी निधन झाले. अपघातग्रस्तांना महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी तात्काळ सहाय्य केले. या अपघातात अक्षय निकम हे गंभीर जखमी अवस्थेत होते. यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातात या कारमधील किरण निकम यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर संतोष रेडीज, रमाकांत पांचाळ व प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या गाडीत एकूण सात जण प्रवास करीत होते. या दुर्देवी अपघातानंतर रत्नागिरीत हळहळ व्यक्त करण्यात आली.