Latur News – गळ्यातील मंगळसूत्र-गंठण चोरणाऱ्या महिलांना अटक; एक लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

लातुर शहरात व जिल्ह्यातील विविध ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण चोरणाऱ्या महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत त्यांच्याकडून 40.5 ग्राम सोन्याच्या दागिन्यांसह 1 लाख 33 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकांमध्ये गर्दीची फायदा घेत बस मधून चढ-उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व गंठण चोरण्यात येत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार 30 जानेवारी 2025 रोजी पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर महिला चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना रेनापुर नाका ते गरुड चौक जाणाऱ्या रोडवरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्वाती उमाकांत तपसाळे आणि महादेवी सर्जेराव देडे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चोरी केल्याचे कबुल केले आहे. पोलीस ठाणे औसा येथील मंगळसूत्र चोरीचे 2 गुन्हे, पोलीस ठाणे गांधीचौक व निलंगा येथील प्रत्येकी 1 गुन्हा असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे 40.5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्रे, गंठण एकूण 1 लाख 33 हजार 194 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक हे करीत आहेत.

सदरची कारवाई उप-निरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कांचे तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, महिला पोलीस अमलदार हिंगे, चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.