38th National Games – खो-खो मध्ये महाराष्ट्रचा दुहेरी धमाका! महिला व पुरूष संघांनी सुवर्णपदक राखले

गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो खो संघांनी आपल्या लौकिकास जागत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदके जिंकून दुहेरी धमाका केला. चुरशीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या महिलांनी ओडिशाचा 31-28 असा 3 गुणांनी पराभव करत जेतेपद राखले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने मात्र, सव्वा सात मिनिटे राखून व 6 गुणांनी (32-26) असा पाडाव करत रुबाबात पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली.

इंदिरागांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात  महाराष्ट्राला ओडिशाने कडवी झुंझ दिली. तिसऱ्या टर्नमध्ये संरक्षण करताना एका मिनिटात महाराष्ट्राचे तीन खेळाडू बाद झाल्याने धाकधूक वाढली होती. त्यातच गौरी शिंदे पळतीच्या वेळी पाय मुरगळून दुखापत झाल्याने ओडिशाचा हुरूप वाढला होता. मात्र, वेळीच स्वतःला सावरत सांघिक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या महिलांनी सुवर्णपदक राखण्यात यश मिळविले. मध्यंतराला महाराष्ट्राकडे तीन गुणांची (15-12) आघाडी होती. महाराष्ट्राकडून प्रियांका इंगळे (1.30 मि. , 1.52 मि.  संरक्षण आणि 4 गुण), अश्विनी शिंदे (1.23 मि. संरक्षण व 10 गुण), संध्या सुरवसे (2.24 मि., 2.23 मि. संरक्षण व 2 गुण), रेश्मा राठोड (1.11 मि., 1.45 मि. संरक्षण आणि 4 गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.  ओडिसाकडून अर्चना प्रधान (1 मि., 1.35 मि. संरक्षण आणि 4 गुण), सुभश्री सिंग (1.8 मि. संरक्षण व 6 गुण) यांनी तोडीस तोड खेळ केला, पण त्यांना यंदाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पुरुष संघाला एकतर्फी जेतेपद

पुरूष गटात महाराष्ट्राने ओडिसाचा सव्वा सात मिनिटे राखून व 6 गुणांनी (32-26) धुव्वा उडवीत सुवर्णपदकावर रुबाबात नाव कोरले. महाराष्ट्राच्या रामजी कश्यप (2.20 मि., 1.10 मि. संरक्षण व 2 गुण), सुयश गरगटे (1.10 मि. संरक्षण व 6 गुण), अनिकेत चेंदवणेकर (1 मि. व 2 मि. संरक्षण), प्रतिक वायकर (1 मि. संरक्षण व 6 गुण), शुभम थोरात (1.30 मि., 1.20 मि. संरक्षण आणि 2 गुण) यांनी भन्नाट खेळ केला. पराभूत ओडिशाकडून पाबनी साबर (1 मि. संरक्षण व 6 गुण), सुनिल पात्रा (1.10 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी महाराष्ट्राला दिलेली झुंज अपयशी ठरली.

“माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असली, तरी वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडू आमच्या संघात असल्याने जेतेपदाची खात्री होती. प्रशिक्षकांनी आमच्याकडुन चांगली तयारी करून घेतली होती. दावपेजा प्रमाणे खेळ होऊ न शकल्याने मोठा विजय मिळविता आला नाही, पण सुवर्णपदक राखण्यात यशस्वी ठरलो, त्यामुळे दिलासा मिळाला”.
– संपदा मोरे, कर्णधार

“आम्हीच सुवर्ण पदक जिंकणार याची खात्री होती. मात्र, आम्ही गाफील नव्हतो. खरं तर आम्ही सुवर्ण पदकाच्या लढाईत डावाने बाजी मारण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, हा विजयही तसा मोठाच आहे, यात वादच नाही”.
– गजानन शेंगाळ, कर्णधार