>> तरंग वैद्य
नातेसंबंध, कुटुंबाचे महत्त्व ताकदीने अधोरेखित करणारी, प्रत्येकाने पाहावी अशी ही वेबसीरिज.
तीन भावंडं, त्यांचे नातेसंबंध, त्यांचे रुसवेफुगवे, भांडणं, प्रेम हे विविध पैलू उलगडतात एका ‘रोड ट्रिप’च्या दरम्यान. ही एका ओळीत ‘ट्रिपलिंग’ या वेबसीरिजची कथा. मोठा भाऊ चंदन अचानक अमेरिकेतून परत येतो आपल्या लहान भावाकडे चितवनकडे. जो दिल्लीत ‘डीजे’ म्हणून काम करीत आहे. मग हे दोघे भाऊ आपल्या बहिणीला चंचलला भेटण्यासाठी तिच्या सासरी जोधपूरला जातात आणि मग तिघे आपल्या आई-वडिलांना भेटायला मनालीला जातात. हा सर्व प्रवास चारचाकीने होतो. या रोड ट्रिपच्या दरम्यान काही अडचणी येतात, काही गमती जमती होतात आणि तिघांचे स्वभाव उलगडतात. तिघे लांब लांब राहत असल्यामुळे वारंवार भेटू शकत नाहीत, पण त्यांचे बोलणेही खूप कमी होत असते. चंदनने लग्न केले आणि आता घटस्फोट झाला हे चितवन आणि चंचलला तो भेटल्यावर समजते. थोडक्यात तिघांत ‘कम्युनिकेशन गॅप’ खूप मोठी असते. तिघे मनालीला पोहोचल्यावर आई-वडिलांना आश्चर्याचा सुखद धक्का देतात. ही ‘ट्रिपलिंग’ सीजन-1 ची कथा. सप्टेंबर 2016 ला 22-25 मिनिटांचे 5 भाग असलेला हा सीजन खूप गाजला. 5 एप्रिल 2019 ला सीजन-2 चे 5 एपिसोड आणि 21 ऑक्टोबर 2022 ला आणखीन 5 एपिसोडचा सीजन-3 आला. हे सर्व सीजन झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
आपण सीजन 1 मध्येच बघितले त्या अनुभवांवर चंदनने एक पुस्तक लिहिले असून ते खूप गाजले आहे. आता त्याच्या पुस्तकावर चित्रपटही बनतोय… इथपासून सीजन-2 ची सुरुवात होते. चितवन आता एका स्त्राrसोबत ‘लिव्ह इन जावई’ म्हणून राहतो आहे. चंदन आणि चितवन भेटतात आणि चंचलचा फोन येतो आणि कळते तिचा नवरा प्रणव गायब आहे. तिघे निघतात, लखनऊ, कोलकाता होत गंगटोकला पोहोचतात आणि प्रणवला शोधून काढतात. सीजन-3 मध्ये तिघांना कळते की, त्यांचे आई-वडील विभक्त होत आहेत आणि तिघे मनालीला पोहोचतात.
कथा ‘रोड ट्रिप’ने पुढे जात असली तरी नातेसंबंध उलगडणारी आहे. बालपणी भावंडांमधील नात्याची वीण घट्ट असते, पण पुढे विविध कारणांवरून ती सैल होत जाते. हा प्रकार हल्ली नात्यांमध्ये खूप
कॉमन असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना खूप जवळची वाटली आणि त्यामुळेच यशस्वीही झाली. ‘ट्रिपलिंग’च्या यशामध्ये त्याच्या संवादांचा मोठा वाटा आहे. चंचल, चितवन, चंदन प्रत्येकाचे संवाद त्यांची व्यक्तिरेखा स्पष्ट करतात. चितवनचे फटकळ संवाद अधूनमधून हास्य लकेर पसरवतात. तसेच मालिकेतील गाणी आणि पार्श्वसंगीत प्रसंगांना अनुसरून असल्यामुळे प्रशंसनीय आहे.
अभिनयाबद्दल बोलायचे तर सर्वच कलाकार उत्तम अभिनयाचा नजराणा घेऊन आले आहेत. सुमित व्यास यांनी लेखन आणि अभिनय या दोन्ही पिचवर दमदार बॅटिंग केली आहे. आधीचा बिनधास्त चितवन आणि नंतर लहानग्याचा बाप झालेला हळवा चितवन या वेगवेगळ्या भावना अमोल पराशरने छान व्यक्त केल्या आहेत. कुणाल रॉय कपूरने राजस्थानी राजा छान रंगवला आहे. मानवी गागरू चंचलच्या भूमिकेत खरी वाटली आहे. आई-वडिलांच्या भूमिकेत कुमुद मिश्रा आणि शेरनाज पटेल आहेत ज्यांचा अभिनय खूप स्वाभाविक आहे.
या वेबसीरिजमध्ये लहानपणीच्या आठवणी आणि वर्तमानाची सांगड खूप छान पद्धतीने घातली आहे. मुले आपल्या आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घेतात तेव्हा आई-वडिलांना सांगत नाहीत किंवा गृहीत धरतात, पण आई-वडिलांनी आपल्या निर्णयांबद्दल मुलांना सांगितले नाही तर मुले त्यांना बेजबाबदार म्हणतात, हे कटू सत्य आपण अनेक वेळा बघतो किंवा अनुभवतो, हेच या मालिकेत अधोरेखित केले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मालिका बघितल्यावर आता तरी नातेसंबंध जपूया ही भावना निर्माण होते. ही भावना निर्माण होणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे काळाची आणि समाजाची गरज आहे. त्यामुळे हसता हसता डोळे पाणवणारी ‘ट्रिपलिंग’ही मालिका चुकवू नका.
[email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)