तुम्हालाही मधुमेह आहे का!!! मग ‘या’ फळाचे सेवन तुमच्यासाठी ठरेल लाभदायक..

किवीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे मलावरोधाचा जर त्रास होत असले तर किवी खावी. फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.

आहारात काही फळे ही खूप महत्त्वाची मानली जातात. त्यातीलच एक महत्त्वाचं फळ म्हणजे किवी. किवी या फळाची खासियत म्हणजे यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे, मधुमेही रुग्ण हे फळ बिनदिक्कतपणे डोळे झाकून खाऊ शकतात.

मधुमेहींसाठी किवी हे फळ अगदी योग्य फळ मानले जाते. किवीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, तसेच या फळामध्ये उच्च फायबर आणि कमी कॅलरीज असतात. त्यामुळेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी योग्य पर्याय मानला जातो.

किवी केवळ मधुमेहींसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा पोषक आहे. त्यामुळे मधुमेहींसोबतच इतरही या फळांमध्ये असलेल्या पोषक तत्वांचा लाभ घेऊ शकतात. जाणून घेऊया किवीचे आपल्या आहारातील अनन्यसाधारण महत्त्व.

किवीमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. तसेच अँटीऑक्सिडंट, फाइबर, पोटॅशियम यासारखे पोषक तत्वही किवीत मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत किवी फळ खाणं सर्वांसाठी खूप गरजेचं झालेलं आहे.

सध्या बाजारात किवी हे फळ सहज उपलब्ध असते. आंबट गोड चवीचे हे फळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

किवी हे रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. तसेच या फळामधून आपल्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे देखील प्रदान होण्यास मदत होते.

किवीमध्ये व्हिटॅमिन बी६, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फॉस्फरस, मॅग्नेशियम, तांबे, जस्त, बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटक आढळतात.

किवीमध्ये असलेल्या सेरोटोनिनमुळे आपले हॅप्पी हार्मोन्स वाढण्यास मदत होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तज्ज्ञही रोज किवी खाण्याचा सल्ला देतात.

किवीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर जठराच्या समस्यांमध्ये किवी उपयुक्त मानले जाते.

किवीमुळे आपल्या हृद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच या फळात असलेल्या गुणधर्मामुळे झोपही उत्तम लागते.

किवीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि ई केस गळतीवर अतिशय प्रभावी मानले जाते.

किवी रक्तदाब कमी करू शकते आणि रक्त गोठणे कमी करू शकते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.

किवीच्या नियमित सेवनामुळे श्वसनकार्य सुधारते, तसेच दम्याचा त्रासही कमी होतो. किवीमध्ये असलेल्या अ आणि ई या जीवनसत्वांच्या प्रमाणामुळे डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होतो.

स्त्रियांमध्ये चाळीशीनंतर हाडांची दुखणी सुरू होतात, यावर किवी हे अतिशय प्रभावी मानलेले आहे. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक तत्वे असतात. ज्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राखले जाते. म्हणूनच किवीच्या नियमित सेवनामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. यामुळेच ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही कमी होण्यास मदत होते.

(टिप- घरी कोणतेही उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आपण तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.)