बालकथा – गाढवांचा चमत्कार

>> सुरेश एकांक

चंदनपूर वननगरीतल्या वाघोबांच्या चिरंजिवांनी गाढवोबाशी मैत्री केली, ते इतर वननगरीतील वाघोबांना आवडलं नाही. गाढवासारख्या मूर्ख प्राण्याला चंदनपूरच्या वाघोबाचा मुलगा मित्र करतो, हा आपला अपमान असल्याचं इतर वननगरीतील वाघोबांना वाटलं. त्यामुळे त्यांनी निषेधाचे खलिते चंदनपूरच्या वाघोबांकडे पाठवले. ते खलिते वाघोबांनी वाचून फेकून दिले.

चंदनपूरच्या वाघोबांनी आपल्या निषेधाच्या खलित्यांकडे दुर्लक्ष करून, मुलाला रागावण्याऐवजी आणखी प्रोत्साहन दिलं. ही बाब इतर वननगरीतल्या वाघोबांना कळली. त्यामुळे त्या सर्वांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. चंदनपूरच्या वाघोबांवर हल्ला करून त्याला ठार करायचं आणि आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा निर्धार इतर वाघोबांनी केला. चंदनपूरच्या वाघोबांपर्यंत इतर वननगरीतील वाघोबांच्या हल्ल्याची गोष्ट पोहचली. त्यांना काळजी वाटू लागली. कारण इतक्या सगळय़ा वाघोबांसोबत एकटय़ानं लढा देणं सोपं नव्हतं. त्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. त्यांचे अन्नपाण्यावरून लक्ष उडाले.

त्यांची ही अवस्था गाढवोबास बघवली गेली नाही. तो वाघोबांना म्हणाला, “महाराज, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्यासारख्या अत्यंत क्षुल्लक प्राण्यास तुम्ही आणि राजपुत्राने सन्मान दिला. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे युध्द झालेच तर, आम्ही सर्व गाढवं तुमच्यासोबत आहोत. गाढवांचा मूर्खपणाच फक्त सर्वांना ठाऊकाय. आमच्या पायातल्या शक्तीची कल्पना नाही कुणाला?’’ गाढवोबा चिंताग्रस्त वाघोबांना म्हणाले.

“पायातली शक्ती म्हणजे रे काय?’’
“गाढवाच्या लाथेचा प्रसाद भल्याभल्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी आणतो, इतकी त्यात शक्ती असते.’’ गाढव म्हणाले. मात्र, वाघोबाचं समाधान झालं नाही. ते गाढवोबास म्हणाले,
“अरे बाळा, माझ्यावरील आक्रमणाच्या वेळेस तुला पुढे करून तुझा जीव धोक्यात टाकायचा नाहीये.’’
“महाराज क्षमा असावी. माझा जीव धोक्यात येण्याची जशी शक्यता आहे, तशीच शक्यता आमच्यामुळे आपल्या शत्रूला पळता भुई थोडे होण्याचीसुध्दा आहे.’’
“म्हणजे कशी?’’
“महाराज, राजपुत्राने मला मित्र केल्याने व तुमची संमती असल्याने चंदनपूर वननगरीतील सर्व गाढवे तुमचा खूप आदर करतात. त्यामुळे तुमच्यावर संकट येणार असं समजल्यावर प्रत्येक गाढवाने तुमच्या बाजूने उभं राहण्याचं ठरवलंय.’’
“म्हणजे रे काय, मित्रा?’’ राजपुत्राने विचारलं.
“महाराज, आपल्यावर हल्ला करणारे इतर वननगरीतील वाघोबा असून असून किती असतील, 20 ते 25 किंवा शंभर. पण आम्ही गाढवं हजार आहोत. आम्ही वननगरीच्या सीमेवर दबा धरून बसू. इतर वननगरीतील वाघोबा आपल्यावर आक्रमण करतील, तेव्हा त्यांना लाथेचा प्रसाद देऊन वेगाने पळून जाऊ. त्यात काही गाढवांचा प्राण जाईल. पण महाराज, इतर वननगरीतले वाघोबा त्रस्त होतील.’’
“महाराज, आणखी एक गुपित आहे. त्याची इतर वननगरीतील वाघोबा कल्पनाही करू शकणार नाहीत.’’

“म्हणजे काय?’’ वाघोबा आणि राजपुत्राने एकाच वेळेस विचारलं.
“महाराज, तुम्ही आणि राजपुत्र एका गाढवास सन्मानाने वागवता, त्याचा आदर करता हे इतर वननगरीतील गाढवांना कळलंय. त्यांना तिकडे कुणीही मानसन्मान देत नाही. त्यांच्याशी तुसडेपणाने वागतात. त्यामुळे इतर वननगरीतील गाढवांना तुमच्याबद्दल खूप आदर निर्माण झालाय. इतर वननगरीतील वाघोबा जेव्हा चंदनपूरवर हल्ला करतील तेव्हा, आपल्या सीमेवर आम्ही त्यांना लाथा हाणून हाणून त्रस्त करून सोडू. हे वाघोबा जेव्हा पळू लागतील, तेव्हा दुसऱया बाजूने इतर गाढवं त्यांच्यावर लत्ताप्रहार करण्यासाठी सज्ज असतील. इतर वननगरीतील वाघोबांना असा चौफेर लत्ताप्रहार मिळेल.’’ गाढवोबा एका दमात सांगता झाला.

पुढे काही दिवसांनी इतर वननगरीतील वाघोबांनी चंदनपूरवर हल्ला केला, तेव्हा गाढवोबांनी जसं वाघोबांना सांगितलं होतं, तसंच घडलं. या अनपेक्षित हल्ल्याने इतर वननगरीतले वाघोबा एकदम हडबडून आणि गडबडून गेले. गाढवांच्या लाथांपुढे त्यांची शक्ती कमी पडू लागली. काही वाघांनी माघार घेतली तर दुसऱया बाजूने गाढवांची मोठी फळी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी तयारच होती. इकडे तिकडे गाढवंच गाढवं! त्या गाढवांचा सामना करणं अशक्य असल्याचं बहुतेक वाघांच्या लक्षात आलं. प्रत्येकानं गाढवांचा लत्ताप्रहार टाळण्यासाठी तिथून पळ काढला.
चंदनपूरच्या वाघोबांना गाढवाशी मैत्री अशी फायदेशीर ठरली.