<<< शुभांगी बागडे >>>
नमिता गोखले या इंग्रजीत लेखन करणाऱ्या एक प्रथितयश भारतीय लेखिका. एक संवेदनक्षम लेखिका म्हणून नमिता गोखले परिचित आहेत. ‘थिंग्ज टू लिव्ह बिहाइंड’ या त्यांच्या कादंबरीला 2021 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. सुप्रसिद्ध ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’च्या त्या संस्थापक आणि सहसंचालकदेखील आहेत. ‘जयपूर लिटफेस्ट’ म्हणजेच जयपूर साहित्य महोत्सव 2025 हा 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान जयपूरच्या क्लार्क्स आमेर हॉटेलमध्ये पार पडत आहे. या महोत्सवात अनेक जगप्रसिद्ध लेखक, कवी, वक्ते सहभागी झाले आहेत. विविध भारतीय भाषांमध्ये सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या सहसंस्थापक, संचालक आणि साहित्यिका नमिता गोखले यांच्या साहित्य प्रवासाबाबत व महोत्सवाबाबत साधलेला संवाद.
चित्रपट मासिकाच्या संपादनापासून ते जयपूर साहित्य महोत्सवाची सर्वार्थाने धुरा सांभाळणं हा तुमचा प्रवास अतिशय वेगळा आहे. हा तुमचा प्रवास आणि जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल सुरू करण्यासाठी तुम्हाला मिळालेली प्रेरणा याबाबत जाणून घ्यायला आवडेल.
माझं लेखन अगदी महाविद्यालयीन जीवनातच सुरू झाले. मी इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत होते आणि त्याच वेळी मी हिंदी साहित्यावर आधारित रिसर्च पेपर करण्याचा पर्याय निवडला, जो अभ्यासक्रमात होता. पण हे मिशनरी संचालित महाविद्यालयाला काही रुचले नाही. तिथून बाहेर पडायचा निर्णय घेत मी माझ्या लेखन स्वातंत्र्याची निवड केली आणि तेव्हापासूनच माझा लेखिका होण्याचा प्रवास सुरू झाला असे म्हणण्यास हरकत नाही. मी 18 वर्षांची असताना वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली. माझे दिवंगत पती राजीव गोखले यांच्यासोबत मी अनेक सुख-दु:ख, चढ-उतार पाहिले. स्वतंत्रपणेही अनुभवले. परंतु सोबत लेखिका म्हणून माझी जडणघडण सुरूच होती. मी मुंबईत ‘सुपर’ नावाचे एक चित्रपट मासिक सुरू केले.
प्रकाशक, लेखक, संपादक म्हणून सर्वार्थाने लेखन संस्कृतीचा मी अनुभव घेतला. याच काळात मी माझ्या पहिल्या कादंबरीवर काम करायला सुरुवात केली. ‘पारो’ ही माझी कांदबरी मी 28 वर्षांची असताना प्रकाशित झाली जी भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही लोकप्रिय ठरली. यानंतर पुढचे पुस्तक प्रकाशित व्हायला मात्र 10 वर्षांचा कालावधी लागला. आता मागे वळून पाहताना लक्षात येतं की, आपण 70च्या आसपास आहोत, 25 एक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलसारखा साहित्य महोत्सव सुरू करून 18 वर्षांचा काळ लोटला आहे आणि हा लेखनाचा, साहित्याचा गुणाकारच. ज्याने मला समृद्ध केलं आहे.
जेएलएफच्या सहसंस्थापक, संचालक म्हणून, या साहित्य महोत्सवाबाबत तुम्हाला कोणती आव्हाने जाणवतात? कसा आहे तुमचा अनुभव?
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलशी जोडले जाणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी गोष्ट. एका छोट्याशा जिव्हाळ्याच्या साहित्य उत्सवाने अकल्पित अशी उंची गाठली आहे. हा महोत्सव जगभरात लोकप्रिय होण्याचे श्रेय आमच्या संपूर्ण टीमचे आहे. माझे सहदिग्दर्शक विल्यम डॅलरिम्पल आणि निर्माता संजय रॉय व इतर अनेक प्रतिभावान लोकांच्या अमूल्य योगदानामुळेच हा महोत्सव यशस्वी ठरला आहे. यादरम्यान अनेक आव्हाने पेलली. अनेक अनुभव आले आणि अर्थात ते चांगलेच आहेत. मात्र याबाबत एक गोष्ट अधोरेखीत करेन ती म्हणजे महान लेखक आणि विचारवंत हे महान का ठरतात तर ते त्यांच्या नम्र आणि आत्मीय सुसंवादामुळे, वृत्तीमुळे. हे खरोखरच शिकण्यासारखे आहे.
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा चाहता वर्ग जगभर आहे. जगभरातील लेखक, वाचक आणि इच्छुक लेखक या साऱ्यांनाच आकर्षित करणारा हा महोत्सव साहित्य विश्वातील एक बेंचमार्क ठरला आहे. यासोबतच जयपूर या शहराचीही एक वेगळी ओळख आहे. या शहराशी तुमचं असलेलं नातं नेमकं काय आहे?
जयपूर साहित्य महोत्सव हा नेहमीच कथा, कल्पना आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम ठरला आहे. परंपरा आणि वारसा असलेले हे शहर तितकंच आधुनिक आणि कॉस्मोपॉलिटनदेखील आहे. मी तिला माझी कर्मभूमी मानते. शब्दांचा उत्सव साजरा करणाऱ्या या गुलाबी शहराने मला खूप काही दिले आहे. दर जानेवारीत, जग जयपूरला भेट देते आणि जयपूर जगाला भेट देतात आणि ते एकमेकांकडून बरंच काही शिकतात! आणि याचं माध्यम आम्ही आहोत हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. इतकंच की या शहराला आमचा हा उत्सव आवडतो आणि आम्हाला हे शहर आवडते.
साहित्य क्षेत्र आणि साहित्य महोत्सव यात सध्या मोठा बदल, परिवर्तन दिसून येत आहे. याबाबत तुमचे निरीक्षण काय आहे?
भारतात सध्या साहित्य क्षेत्रात अनेक स्तरावर साहित्यिक आदानप्रदान होताना दिसत आहे. जिथे सर्व अनेक भारतीय भाषा (इंग्रजीसह जी भारतीय भाषादेखील आहे) अनुवादाद्वारे एकमेकांशी संवाद साधत आहेत आणि साहित्य महोत्सवांमध्ये लोकांमध्ये देवाणघेवाण होत आहे. सध्या देशभरात अनेक साहित्य महोत्सव होत आहेत. हे साहित्यसंस्कृती ही आपली ओळख ठरावी असे हे साहित्य महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांची व्याप्ती, आवाका कमीअधिक असला तरी हे महोत्सव महत्त्वाचा ठसा उमटवत आहेत. त्या त्या गाव, शहर, खेड्यांतील बोली भाषा, कला, संगीत, लोकसंस्कृतीचे जतन करीत या उत्सवांद्वारे बाहेरच्या विशाल जगापर्यंत पोहोचण्याची पायवाटच तयार करतात. हे घडणं आणि सातत्याने घडत राहणं आवश्यक आहे. यामुळे वाचन संस्कृतीला बहर येत आहे हा आणखी महत्त्वाचा मुद्दा. विविध संस्कृती आणि संवाद यांचं हे एकत्र नांदणं किती छान आहे.
जेएलएफमध्ये अनेक प्रवत्ते, लेखक सहभागी होतात. वाचकांपर्यंत वैविध्यपूर्ण साहित्य, लेखक पोहोचावेत यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न करता?
साहित्य महोत्सव आवडणाऱ्या, पाहणाऱ्या रसिकांचा विचार करीत आम्ही लेखक, साहित्य यांच्या निवडीबाबत शक्य तितके वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न करतो. हा शब्दांचा, साहित्याचा उत्सव आहे. त्यामुळेच समान वैचारिक पार्श्वभूमी असलेले, भिन्न आणि विरोधी दृष्टिकोन असलेले वत्ते, लेखक हे सारेच एकमेकांचा आदर करीत एकाच मंचावर येतात. साहित्यातून निर्माण होणारी ही शहाणीव आहे, जी आपसूकच रसिकांपर्यंतही पोहोचते.
जेएलएफ हे भारतातील तरुण लेखक आणि वाचकांना प्रेरित करते. त्यांना या उत्सवात नेमकं काय आकर्षित करते?
माझे सहदिग्दर्शक विल्यम डॅलरीम्पल, निर्माता संजय रॉय आणि मी असे आम्ही वर्षभर कार्यक्रमांमध्ये वैविध्य यावं यासाठी प्रयत्न करीत असतो. आमची प्रत्येकाची स्वतंत्र साहित्य रुची आहे, ज्या आधारावर ही निवड असते आणि रसिकांची रुची जाणत त्यात परिपूर्णता साधण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
जेएलएफमध्ये आपण पुस्तकांबद्दल बोलतो. पण ऑडिओ बुक्सचे भवितव्य काय?
जेएलएफ म्हणजे खरंतर दृकश्राव्य संवेदन असणारा साहित्य महोत्सव असेच म्हणावे लागेल. मला ऑडिओ बुक्स ऐकायला खूप आवडते. माझी स्वतची ‘द ट्रेझर्स ऑफ लक्ष्मी’, ‘पफीन महाभारत’ यासह इतर काही पुस्तकंही ऑडिओ बुक्सच्या रूपात उत्कृष्टपणे तयार केली गेली आहेत. सोबत या लिटफेस्टमध्ये, आम्ही भारताच्या मौखिक परंपरांवरदेखील भर देतो. या वर्षी फड सादरीकरण, धार्मिक पठण, कथाकथन यावरदेखील एक सत्र आयोजित करण्यात आले आहे.
तुमचा लेखन प्रवास पाहता, तुमचं साहित्य स्त्रीकेंद्रित असून तुमची स्त्री पात्रे त्यांच्या स्वतंत्र वाटेवर चालतात. या प्रकारच्या लेखनामागची प्रेरणा काय आहे?
मी जन्माने कुमाऊँ, जो नैनिताल उत्तराखंडचा भाग आहे. माझे पहिले नाव नमिता पंत आणि माझे पूर्वज 16व्या शतकात महाराष्ट्रातून इथे आले होते. हा सगळा पर्वतीय, दऱ्याखोऱ्यातला भाग. या पर्वतीय स्त्रिया जात्याच मजबूत, स्वतंत्र आणि लवचिक असते. माझी जडणघडणच अशा वातावरणात झाली. अशा कणखर, खंबीर स्त्रियांचा सहवास मला लाभला. माझ्यावर माझी आजी शकुंतला पांडे यांचा विशेष प्रभाव आहे. त्यामुळेच स्वतंत्र वाटेवर चालणारी माझ्या कादंबरीतून डोकावत राहते.
लेखिका म्हणून तुमचा प्रवास जाणून घेताना त्यातलं विषयांचं वैविध्य लक्षात येतंच, परंतु तुमची बहुतेक पुस्तके पौराणिक पात्रांवर आधारित आहेत. जसे शकुंतला, पारो, सीता, राधा… या प्रकारच्या लेखनाची प्रेरणा किंवा कथानक काय आहे?
मी माझी पहिली कादंबरी, ‘पारो – ड्रीम्स ऑफ पॅशन’ ही मी फक्त 26 वर्षांचा असताना लिहिली होती. ती 1984मध्ये प्रकाशित झाली होती, जेव्हा मी 28 वर्षांचा होते. पारो ही त्या काळातील अभिनव, विदारक आणि तितकीच बोल्ड अशी कादंबरी एका स्त्रीच्या विदारक आयुष्याचा ठाव घेते. इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान यांचा मेळ साधत ही कहाणी प्राचीन वातावरणाचा परीघ ओलांडून त्याच्याही पलीकडे जाते. यातील संवेदना वाचकांना रुचल्या तितक्याच त्या नाकारल्याही. ‘पेंग्विन मॉडर्न क्लासिक’च्या या पुस्तकाला आजही मागणी आहे. ‘पारो’नंतर मी 25 पुस्तके लिहिली.
कादंबरी, तरुण वाचकांना आवडणारे विषय, पौराणिक कथांवर आधारित पुस्तकं, त्याविषयीचे संपादन, हिमालयातील प्रथा, परंपरा व संस्कृती यांची अभ्यासपूर्ण मांडणी असे अनेक विषय मी लेखनात हाताळले. सीता, राधा आणि लक्ष्मी यांच्यावर मी संपादित केलेली तीन पुस्तके (डॉ. मालाश्री लाल यांच्यासोबत) ही सर्व ‘देवी ट्रायोलॉजी’चा भाग आहेत. त्यांच्यावर काम करण्याच्या प्रक्रियेतून मला खूप काही शिकायला मिळाले. आजही नवीन विषय हाताळताना त्यात शिकण्याचा भाग जास्त असतो. लेखन सर्वार्थाने समृद्ध करत जातं. हा अनुभव जगणं कृतार्थ करणारा आहे.