रंगभूमी – झेंडा रंगभूमीचा…

<<< अभिराम भडकमकर >>>

नाटक हा मराठी अस्मितेचा विषय आहे असं नेहमी म्हटलं जातं. पण ती महाराष्ट्रापुरती न राहता भारतभर पसरावी हे स्वप्न पाहणं आता गरजेचं आहे. यंदाच्या दिल्लीत भरणाऱ्या भारत रंग महोत्सवात तब्बल चार मराठी नाटकं निवडली गेली हे विशेषच. मराठी रंगभूमी ही एकमेव रंगभूमी अशी आहे ज्यावर सादर होणारे आधुनिक मराठी नाटक हे रसिकांच्या आश्रयावर खंबीरपणे उभं आहे. कदाचित महोत्सवातील सहभागामुळे आणि प्रभावामुळे आपल्याला अन्य दारंही उघडली जातील.

पराक्रमी पेशव्यांनी महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार लावला होता. त्यानंतर संपूर्ण भारत पादाक्रांत करण्याची महत्त्वाकांक्षा फारशी कुठे आपल्याला दिसली नाही. मराठी रंगभूमीवरही यापेक्षा काही वेगळे नाही. आपलं नाटक भारतभर व्हावं त्यासाठी काही निश्चित प्रयत्न करावेत, असं कुणाला वाटत नाही. त्यामुळेच यंदाच्या दिल्लीत भरणाऱ्या भारत रंग महोत्सवात तब्बल चार मराठी नाटकं निवडली गेली हे विशेषच. गेली काही वर्षे ‘भारत रंग महोत्सव’ हा राष्ट्रीय नाट्य विद्यालय आयोजित महोत्सव भारतातील देशी-विदेशी नाटकांचा एक प्रतिष्ठित महोत्सव म्हणून ख्याती पावला आहे.

पहिल्याच वर्षी कुमार सोहनी दिग्दर्शित माझं ‘देहभान’ हे नाटक ‘भारंगम’मध्ये सादर झालं होतं. नंतर ‘सुखांशी भांडतो आम्ही’ हे ऑस्ट्रेलियातील नेपोलियन अल्मेडा या दिग्दर्शकाने सादर केलं. तसं दरवर्षीच एखाद्दुसरं मराठी नाटक ‘भारंगम’मध्ये निश्चित असतं. पण मुळात मराठी माणूस हा तसा आत्ममग्न आणि थोडक्यात आनंद मानणारा. त्यामुळे ‘भारंगम’च्या पूर्वीसुद्धा देशातील विविध महोत्सवांमध्ये मराठी नाटकाचा सहभाग हा तसा तुलनेने कमीच दिसायचा. मात्र भारतभर मराठी नाटकांबद्दलचा आदर वेळोवेळी दिसून येतो.

आपल्याकडे व्यावसायिक रंगभूमीवरील निर्माते महोत्सवाच्या एका प्रयोगाला जायचं म्हटलं तर किमान चार-पाच दिवस खर्च होणार. नटसंच एखाददुसरा दिवस तिकडच्या भागांमध्ये फेरफटका मारण्याची हौस भागवून घेणार आणि मग त्या कालावधीमध्ये आठवडाभर इथे प्रयोग बंद करण्यापेक्षा ते टाळलेलंच बरं आणि तसंही एक नाटक कोलकात्यात, चेन्नईत, दिल्लीत होऊन असं काय मोठं घडणार आहे, असाही त्याचा विचार असतो. पण त्यामुळे जे सगळ्यात मोठं नुकसान झालं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते नुकसान असं की, मराठी रंगभूमीचं खऱ्या अर्थाने प्रतिबिंब आणि प्रतिनिधित्व भारतभर झालंच नाही.

काही हौशी नाट्यसंस्थांनी आपले प्रयोग उत्साहाने विविध महोत्सवात केले. पण त्याचा उपयोग मराठी रंगभूमीची प्रतिमा निर्माण होण्यासाठी झाला नाही. मग व्यावसायिक नाटक म्हणजे काहीतरी धंदेवाईकच असा समज पुसला गेला नाही. पूर्वी प्रा. वसंत देव यांनी अनेकानेक साठोत्तरी नाटकं हिंदीमध्ये अनुवादित केल्यामुळे आपली काही मोजकी नाटकं भारतभर पोहोचली. त्यांचे मराठी रंगभूमीवर उपकार आहेत. मग ती अन्य भाषांत अनुवादित झाली. सादरही झाली.

पण मराठी नाटक हे आज स्पर्धा रंगभूमी, हौशी रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवरही अनेक प्रयोग करत आहे. विविध विषयांना भिडत आहे. वेगवेगळे फॉर्म्स आणि शैली यांचा वापर करत आहे. एक नवी मंचपरिभाषा शोधत आहे. हे मराठी रंगभूमीचं खरं स्वरूप राष्ट्रीय पातळीवर उमटलंच नाही. त्यामुळे आपली आत्ममग्नता सोडून ज्याला माझं नाटक बघायचं असेल तो येईल माझ्याकडे ही वृत्ती थोडीशी बाजूला ठेवून भारतभर पोहोचण्याची आवश्यकता आहे.

आपलं नाटक भाषेच्या पलीकडेही पोहोचू शकतं का? भारतभरातील रसिक प्रेक्षकांच्या मनातली स्पंदनं ते टिपू शकतं का? त्यांनाही आपल्या नाटकातून आपलंच काहीतरी मानलं जात आहे असं वाटतं का? याचाही शोध अशा महोत्सवातून घेता येईल.

बंगाली रंगभूमीचा अपवाद वगळता मराठी रंगभूमी ही एकमेव रंगभूमी अशी आहे ज्यावर सादर होणारे आधुनिक मराठी नाटक हे रसिकांच्या आश्रयावर खंबीरपणे उभं आहे. कदाचित महोत्सवातील सहभागामुळे आणि प्रभावामुळे आपल्याला अन्य दारंही उघडली जातील. साऊथचा सिनेमा मुंबई आणि महाराष्ट्रावर राज्य करू शकतो तर आमचं नाटक तिकडे आपला दबदबा निर्माण का करू शकत नाही? याचा विचार अशा महोत्सवाच्या निमित्ताने नक्कीच व्हावा. नाटक हा मराठी अस्मितेचा विषय आहे असं नेहमी म्हटलं जातं. पण ती महाराष्ट्रापुरती न राहता भारतभर पसरावी हे स्वप्न पाहणं आता गरजेचं आहे.

‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक म्हणजे 1921 मध्ये लोकमान्य टिळक फंडासाठी झालेल्या संयुक्त मानापनाच्या प्रयोगाची एक स्मरणयात्रा आहे. हे स्मरण 100 वर्षं उलटल्यानंतर आता राष्ट्रीय पातळीवरून या महोत्सवात होणार आहे, हा आनंदाचा भाग आहे. ‘38 कृष्ण व्हीला’ आणि ‘कलगीतुरा’ या दोन नाटकांसोबतच डॉ. अमोल देशमुख दिग्दर्शित ‘कंजूस’ या एमआयटी, पुणे नाट्य विभागाच्या नाटकाचाही प्रयोग होतो आहे. या मुलांना हा प्रयोग एक वेगळाच आनंद आणि अनुभव देऊन जाईल हे नक्की. नाट्य प्रशिक्षणात अशा महोत्सवातील सहभागही महत्त्वाचा असतो हे ओळखून डॉ. अमोल देशमुख यांनी यात प्रवेशिका पाठवली तो कित्ता अन्य नाट्य विभागांनीही घ्यायला हवा.

[email protected]
(लेखक नाट्यकर्मी असून नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)