>> चंद्रसेन टिळेकर
विवेकाचे अधिष्ठान असलेले ज्ञान कायम योग्य मार्ग दर्शवते. यासाठी हवी असते विवेकबुद्धी. आपल्या सर्वांच्या ठायी असलेली सदसद्विवेकबुद्धी अंमलात आणण्यात आपण कमी पडतो. त्यामुळेच श्रध्दा अन् अंधश्रद्धा यातला गुंता आपल्याला सोडविता येत नाही.
जसजसा काळ पुढे जातो तसतसा माणूस अधिक सुसंस्कृत होतो, असा विश्वास आपल्याला मानवी उपांतीचा अभ्यास केलेली जाणकार मंडळी देत असतात आणि बऱयाच अंशी ते खरेही आहे. अन्यथा आपण अजूनही इतर प्राण्यांप्रमाणे जंगलात राहिलो असतो आणि राहू-केतू नावाच्या राक्षसांनी चंद्र-सूर्याला गिळल्यामुळे ग्रहणे होतात या भ्रमात जसे काही दशकांपूर्वी होतो तसे आताही त्या भ्रमात म्हणजेच अंधश्रद्धेत राहिलो असतो. पण सुसंस्कृत किंवा ज्ञानी होणे म्हणजे केवळ अंधश्रद्धेतून बाहेर पडणे एवढय़ा मर्यादित अर्थाने खरे आहे काय? याचे उत्तर आपल्याला ‘अंनिस’ या प्रबोधनाचे कार्य करणाऱया संस्थेचे दिवंगत संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अत्यंत सार्थपणे देऊन ठेवले आहे. ते नेहमी म्हणत की, ‘अंधश्रद्धा निर्मूलन हा केवळ एक व्यापक समाजपरिवर्तनाचा भाग आहे!’ डॉ. दाभोलकर यांचे हे विधान विचारांती हे कुणालाही पटावे.
या व्यापक समाजपरिवर्तनात जाती निर्मूलन, स्त्राी सबलीकरण, भ्रष्टाचार निर्मूलन, चारित्र्य संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणाधिष्ठित मानवतेची जपणूक यांचा अंतर्भाव होतो. याचाच अर्थ अंधश्रद्धा निर्मूलनामुळे माणूस शहाणा होईल, ज्ञानी होईल हे खरे, पण त्याचबरोबर तो विवेकी झाला पाहिजे. मानवतावादी झाला पाहिजे हेही तितकेच खरे आहे. मानवतावाद व्यक्तीच्या अंगी भिनल्याशिवाय किंवा भिनवल्याशिवाय त्याला दया, क्षमा, शांती यांचे मोल तर कळणार नाहीच, पण ‘करुणा’ या जीवन मूल्याचीही महती कळणार नाही. परिणामी आपल्या जिवाचे जसे मोल आहे तसे दुसऱयाच्या जिवालाही मोल आहे याची जाणीव त्याला असणार नाही. विद्यमान स्थितीतल्या आपल्या समाजाचेही थोडय़ाफार फरकाने हेच झालेले आहे हे अत्यंत खेदाने म्हणावे लागते. नुकतेच परळी – बीडमध्ये जे हत्याकांड झाले ते मानवतेला काळिमा फासणारे नव्हते काय? करुणेचा संदेश देणारा बुद्ध याच देशातला ना? दीडशे वर्षांपूर्वी याच महाराष्ट्रात दीनदुबळ्या पीडितांची कणव येऊन जोतिबा, सावित्रीबाईंनी त्यांना आपल्या पोटाशी धरून मायेचे छत्र त्यांच्या शिरावर धरले हे इतक्या लवकर विसरून गेलो?
शिक्षणामुळे माणूस ज्ञानी होतो, पण तो विवेकी होत नसेल तर आपण त्या संदर्भात काही वेगळी पावले टाकणे आवश्यक नव्हे काय? अर्थात असे परिवर्तन करणे हे या खंडप्राय असलेल्या देशात केवळ एकटय़ा सरकारचे काम नाही तर समाजात परिवर्तन घडवून आणण्याची आकांक्षा असणाऱया अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या अगणित समाजसेवी संस्थांचे काम आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. डॉ. दाभोलकरांच्या भाषेत सांगायचे तर एका निरंतर चालणाऱया अशा व्यापक समाजपरिवर्तनासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे आणि द्विरुक्तीचा दोष पत्करून सांगावे लागेल की, अशा परिवर्तनी ध्यासाचा, चळवळीचा प्राण केवळ ज्ञानी होणे असा नसेल तर विवेकी होणे हाही असेल.
जर असे अत्याचार घडत असतील तर आपल्याला केवळ शिक्षण पध्दतीत बदल करून चालणार नाही, तर कुणाच्याही श्रध्दा-अंधश्रद्धा कुरवाळीत न बसता भक्तीमार्गातील आपल्या कल्पना-संकल्पनाही तपासून घ्याव्या लागतील. आपण अंगिकारलेल्या अध्यात्माची, देवधर्माची कठोर चिकित्सा आपल्याला करावी लागेल. अशा चिकित्सेची महती जाणूनच तुकोबा आपल्याला समजावतात, ‘निंदकाचे घर असावे शेजारी!’ इथे निंदक म्हणजे चिकित्सक हे उघड आहे.
स्पष्ट सांगायचे तर, देवाबद्दल अन् साधू पुरुषांबद्दल आपण फार भाबडय़ा कल्पना करून घेतल्या आहेत. उदा. देव नवसाला पावतो, एखाद्या संत – महंतांच्या अंगी सिध्दी असते. त्या सिध्दीने तो वाटेल तो चमत्कार करू शकतो, संकटात धावा केला की रिकामी असल्यासारखा देव धावून येतो किंवा अमुक तमुक स्वामींचे नुसते स्मरण केले की ते संकटात आपल्या पाठीशी उभे राहतात… इत्यादी इत्यादी! या भाबडेपणाच्या मुळाशी आपल्या भारतीयांच्या हाडामांसी खिळलेली आंधळी व्यक्तीपूजा आहे हे सांगणे न लगे. आपले प्रश्न कुठलीही अदृश्य शक्ती अथवा तथाकथित सिध्दी लाभलेले संत-महंत, साधू पुरुष अथवा स्वयंघोषित बुवा, महाराज अथवा स्वामी सोडविणार नाही, तर ते आपले आपणच सोडवायचे असतात याची खूणगाठ मनाशी आपला समाज केव्हा बांधणार आहे? तरीही आपल्या संकटात देवाला ओढायचे असेल तर निदान कुणी तरी विचारवंताने म्हटल्याप्रमाणे ‘देव त्यालाच मदत करतो जो स्वतला मदत करतो’ हे तरी मान्य व्हावे! देवाची ही व्याख्या अगदी निरीश्वरवादीही मान्य करतील. म्हणूनच प्रवचनकार वामनराव पै यांचे सार्थ वचन आहे, ते म्हणतात, ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’
एखाद्या अतिभाविक माणसाला या वचनात दर्पोक्ती दिसेल, पण विवेकी माणसाला मात्र उभारी दिसेल. आपण भाविक व्हायचे की विवेकी, हे थोडाफार विचार केला तर कुणालाही समजू शकेल. पण दुर्दैवाने आपल्या समाजात विचार करण्याचा फार कंटाळाच आहे. म्हणूनच पु.ल. त्यांच्या ‘एक शून्य मी’ या पुस्तकात म्हणतात, शारीरिक आळस एकवेळ मी समजू शकतो, पण आपल्याला बौध्दिक आळसही का असावा? नेमके हाच प्रश्न सावित्रीबाई आपल्याला त्यांच्या ‘काव्य फुले’ या संग्रहात विचारतात, ‘बुद्धी असुनी चालत नाही, तयास मानव म्हणावे का?’ आपल्या सर्वांच्या ठायी सदसद्विवेकबुद्धी असतेच असते. ती आपण वापरण्याचा कंटाळा करतो हे आपले खरे दुखणे आहे.
हा लेख लिहीत असता ‘अंनिस’ संस्थेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या अॅड. रंजना गवांदे यांच्याकडून समजले की, चेटकीण समजून नाशिक जिह्यातील एका गावातील बाईला बेदम मारहाण होत होती. ती त्यांनी तिथे जाऊन थांबवली आणि त्या स्त्राrचा जीव वाचवला. मी त्यांना धन्यवाद देऊन फोन खाली ठेवला. मनात विचार आला, डॉ. दाभोलकर म्हणतात तो व्यापक सामाजिक परिवर्तनाचा पल्ला तर दूरच राहिला, पण निदान अंधश्रद्धा निर्मूलनाचा जवळचा टप्पा जरी तुम्हा-आम्हा सजग मंडळींना गाठता आला तरी मी म्हणेन, तेही नसे थोडके!
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)