
<<< गुरुनाथ तेंडुलकर >>>
मागे एका लेखात मी उल्लेख केल्याप्रमाणे भगवद्गीता हा ग्रंथ केवळ सातशे श्लोकांचा… म्हणजे छापील आकाराने तरी काही फार मोठं पुस्तक नाही. परंतु या सातशे श्लोकातील एकेका श्लोकावर अनेक ग्रंथ निर्माण होऊ शकतील एवढा ऐवज त्यात सामावलेला आहे.
आजच्या म्हणजेच दुसऱ्या अध्यायातील एकेचाळिसावा श्लोक हा असाच एक… हा श्लोक म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते मोक्षाची इच्छा धरणाऱ्या संन्यस्त वृत्तीच्या माणसांपर्यंत तसंच खेळाडूपासून ते उद्योगपतींपर्यंत सगळ्या प्रकारच्या आणि सगळ्या वयोगटातील माणसांसाठी उपयुक्त असा श्लोक आहे.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात-
व्यवसायात्मिका बुद्धि एकह कुरुनंदन ।
बहुशाखा हि अनंताय बुद्धय अव्यवसायिनाम् ।। 2. 41।।
हे कुरुनंदन, इह व्यवसायिकाः बुद्धि एका (भवति )।
अव्यवसायिनाम् हि बुद्धयाः बहुशाखाः अनंन्ता च (भवति)।
अन्वय आणि भावार्थ –
हे कुरुकुलातील श्रेष्ठ पुत्र अर्जुना, व्यवसाय करणाऱ्याची बुद्धी ही एकाग्र असावी लागते. मात्र ज्यांच्या बुद्धीचा एक निश्चय होत नाही अशा अव्यावसायिक लोकांच्या बुद्धीला मात्र अनंत फाटे फुटलेले असतात.
ह्या श्लोकात मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी एक महामंत्र दडलेला आहे. इथे व्यावसायिक या शब्दाचा नेमका अर्थ जणून घ्यायला हवा. आपण सामान्यत: उद्योगधंदा करणारा, दुकान किंवा कारखाना चालवणारा किंवा डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट अशा प्रकारच्या लोकांना व्यावसायिक हा शब्द वापरतो. पण ते व्यवसाय करणारे वेगळे आणि भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत असणारे व्यावसायिक वेगळे.
भगवंतांनी सांगितलेला व्यायसायिक बुद्धीचा माणूस म्हणजे योजलेलं कार्य निश्चितपणे तडीस नेण्याची उमेद मनात बाळगून त्यासाठी आवश्यक ते कष्ट करणारा. कोणत्याही परिस्थितीत हाती घेतलेलं कार्य पूर्ण करण्याची जिद्द बाळगणारा. कोणत्याही सबबी न सांगता सतत कार्यरत राहणारा… थोडक्यात म्हणजे, यशाचा ध्यास घेतलेला माणूस म्हणजे व्यावसायिक… एक छोटीशी कथा सांगतो.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी `बुद्ध अँड हिज धम्म’ हा ग्रंथ लिहायला घेतला होता त्या वेळची ही घटना.
डोक्यात रात्रंदिवस एकच विचार… अनेक संदर्भग्रंथ, अनेक संशोधन साहित्याचा अभ्यास… त्यातून टिपणं काढणं, वाचन… मनन… चिंतन आणि या साऱया मंथनातून निर्माण होणारं लेखन….
ग्रंथ हळूहळू आकाराला येत होता. एके दिवशी संध्याकाळी बाबासाहेब नेहमीप्रमाणे लिहीत बसले होते. त्यांचे सहाय्यक नानकचंद रत्तू बाबासाहेबांचा निरोप घेऊन निघण्यासाठी थांबले होते. बाबासाहेबांची लेखनात तंद्री लागली होती. बाबासाहेबांचं लक्ष कधी आपल्याकडे जातंय आणि त्यांचा निरोप घेऊन आपण कधी निघतोय याची वाट पाहात रत्तू ताटकळत टेबलापाशी थांबले होते. मध्येच कधीतरी बाबासाहेबांचं लक्ष नानकचंदकडे गेलं. बाबासाहेबांनी एकदा नानकचंदकडे आणि एकदा भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. संध्याकाळचे सात वाजत आले होते.
`अरे, तू अजून थांबलास? चल निघ आता. फार उशीर झाला तुला.’ `हो निघतो मी… पण बाबासाहेब वेळेवर जेवून घ्या. जेवण झाकून टेबलावर ठेवलंय.’ नानकचंद म्हणाले. `हो रे… जेवेन मी वेळेवर. तू निघ आता आणि उद्या सकाळी मात्र जरा लवकर ये. सकाळी नऊच्या आत ये.’
नानकचंद रत्तू निघून गेले आणि बाबासाहेबांनी पुन्हा लिहायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी रत्तू साडेआठ वाजताच हजर झाले. त्यावेळी बाबासाहेब खुर्चीत बसून लिहीत होते. त्यांची तंद्री भंग होऊ नये म्हणून रत्तू टेबलाजवळ येऊन उभे राहिले… काहीही न बोलता.
थोड्या वेळाने बाबासाहेबांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांनी एकदा रत्तूकडे आणि एकदा भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. नऊ वाजून गेले होते. बाबासाहेबांनी काहीशा आश्चर्याने विचारलं, `अरे, तू अजून इथेच…? घरी गेला नाहीस का? घरचे वाट बघत असतील. चल निघ… आणि उद्या मात्र सकाळी जरा लवकर ये. नऊ वाजायच्या आत ये.’
आता आश्चर्य करण्याची पाळी रत्तूंवर होती. बाबासाहेब आदल्या दिवशी संध्याकाळपासून लिहीत होते. एके जागी बसून… सतत पंधरा-सोळा तास.
ही एकाग्रता… हा ध्यास… हे स्वतःला झोकून देणं. इतर सगळं विसरून केवळ हाती घेतलेल्या कामाचाच विचार करणं आणि ते करताना होणाऱ्या इतर परिणामांची तमा न बाळगणं या वृत्तीला व्यावसायिक बुद्धी असं म्हणतात.
या श्लोकावर अजून खूप काही सांगता येईल. आजही आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहिलं तर आपल्याला आढळेल की, प्रत्येक क्षेत्रातील शिखरावर पोहोचलेल्या यशस्वी माणसांनी अशाच प्रकारचा ध्यास घेतलेला असतो. क्रिकेटमधले सचिन तेंडुलकर, महिंद्रसिंग धोनी, विराट कोहली, संगीत क्षेत्रातील लतादीदी, आशाताई, पं. भीमसेन जोशी, पं. जसराजजींपासून ते उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरीप्रसाद चौरसिया, अभिनय क्षेत्रातील अमिताभ बच्चनपासून नाना पाटेकरांपर्यंत…
कोणत्याही क्षेत्रातील अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींच्या चरित्राचा अभ्यास केला तर एक घटक आपल्याला समान आढळतो. तो घटक म्हणजे एकाग्रतेने केलेले परिश्रम. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला `इतर सर्व विचार झटकून केवळ युद्धाचाच विचार कर.’ असा उपदेश करतानाच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसालाही एक दिव्य संदेश देत आहेत.
भगवद्गीतेतील हा एकच संदेश जरी अंमलात आणला तरी आपलं आयुष्य कृतार्थ होईल असं मला वाटतं.