>> राहुल गोखले
ज्याच्या मुख्यत विज्ञान विषयाला वाहिलेल्या मराठी, इंग्रजी आणि अनुवादित पुस्तकांची संख्या शंभरावर आहे असे जोसेफ तुस्कानो यांच्या विपुल लेखनातील निवडक साहित्याचे संकलन करणे हे कठीण काम. त्यातही त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनाचे प्रतिबिंब त्या संकलनात पडायला हवे यादृष्टीने ते संकलन करणे हे आव्हानात्मक. मात्र मनोज आचार्य यांनी ती बाजू सांभाळत ‘निवडक जोसेफ तुस्कानो’ या पुस्तकात तुस्कानो यांच्या लेखनाच्या सर्व बाजूंचे दर्शन वाचकांना घडेल याची काळजी घेतली आहे.
प्रस्तुत पुस्तकातील चार विभागात, दोन विभाग हे विज्ञानकथांना वाहिलेले आहेत. तुस्कानो यांच्या निवडक सोळा कथांमधून त्यांनी हाताळलेल्या विषयांचे वैविध्य लक्षात येईल. या दीर्घकथा नाहीत; मात्र त्यातून तुस्कानो यांनी वाचकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा यांना चालना मिळेल अशी मांडणी केली आहे. ‘ऑक्सिजन’ या कथेत श्याम आणि त्याच्या ‘जिवलग फार्म’मधील झाडांची जवळीक; त्याच्या अनुपस्थितीत मलूल झालेली झाडे; मात्र ज्या झाडांजवळ तो वामकुक्षी घेत असे तेथील झाडांना आलेला बहर इत्यादी कल्पनांतून तुस्कानो वनस्पती आणि माणसाच्या नात्यावर भाष्य करतात.
‘थॅलियम’ कथेतून ते थॅलियम या विषारी धातूच्या दुष्परिणामांची आणि त्याची बाधा झाली तर त्यावरील उपाययोजनांची कहाणी कथन करतातच; पण उंदीर मारण्याचे औषध माणसाच्या सेवनात अपघाताने आले तरी ते किती घातक ठरू शकते याची सजगता निर्माण करतात. रात्रभर मेणबत्ती लावून ठेवलेल्या कमलाबाई यांचा झोपेतच मृत्यू होतो; त्याचे रहस्य उलगडताना वातानुकूलित खोलीत मेणबत्ती पूर्णपणे जळत नाही आणि त्यातून कार्बन मोनोक्साइड हा घातक वायू कसा तयार होतो, माणसाचा घात करतो यावर तुस्कानो यांनी ‘वातानुकूलित कथेतून प्रकाश टाकला आहे. त्यांच्या अन्य कथादेखील वैज्ञानिक सत्ये उलगडून दाखविणाऱया आहेत. ‘सूड’, ‘रंग रक्ताचा’, ‘जनुक’ या कथा उल्लेखनीय. तुस्कानो यांनी अनुवाद केलेल्या चार कथांचा समावेशही या पुस्तकात आहेत.
उर्वरित दोन विभाग हे तुस्कानो यांच्या लेखांच्या संकलनाचे आहेत. त्यांनी वापरलेली ललित शैली ही शास्त्राrय संज्ञा किंवा विषय सोपे करून सांगणारी आहे. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे लेख’ या विभागात ‘मोबाईल मनोऱयांचे धोके’, ‘तेलतवंगाचा हाहाकार’, ‘मोनालिसाच्या गूढ स्मितहास्याचे रहस्य’, ‘ऊर्जा बचत काळाची गरज’ इत्यादी लेखांचा अंतर्भाव आहे. कोणत्याही घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्यातील उपयुक्तता आणि घातकता या दोन्ही बाजूंचे सम्यक आकलन होण्याचा संभव जास्त असतो. त्यामुळे एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना त्याबद्दलचा विवेक जागृत ठेवणे आवश्यक हा संदेश देणारे काही लेख या विभागात आहेत. तिसऱया विभागाचे ‘निसर्ग आणि विज्ञानाचा समन्वय’ हे शीर्षक पुरेसे बोलके. त्या लेखांत कीटकांचे आयुष्य तुस्कानो यांनी उलगडून दाखविले आहे तसेच हवेच्या प्रदूषणाचा मानवी जीवनाला बसणारा फटका काय असतो यावर दृष्टिक्षेप टाकला आहे. ‘प्लॅस्टिकची दुसरीही बाजू’, ‘पानापानातून ऊर्जा’, ‘दवबिंदूंचे पारदर्शी अंतरंग’, ‘इंधन भेसळ आणि पर्यावरण’ इत्यादी लेख वाचनीय.
सामान्य वाचकालाही वैज्ञानिक संकल्पनांचे आकलन होईल अशी तुस्कानो यांची लेखन शैली आणि भाषा आहे. त्यात सोपेपणा आहे, सहजता आहे. ज्येष्ठ कादंबरीकार अनंत सामंत यांनी प्रस्तावनेत आपला मित्र ‘ज्यो’ यांच्यातील साहित्यिकाबरोबरच व्यक्ती म्हणून तुस्कानो यांचे अनेक पैलू दर्शवले आहेत. मनोज आचार्य यांनी व्यक्त केलेले संपादकीय मनोगत मार्मिक.
निवडक जोसेफ तुस्कानो : विज्ञान कथा- लेखरंग
संपादन : मनोज आचार्य
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : 328 मूल्य : रु. 485