>> श्रीकांत आंब्रे
देशासाठी बलिदान हाच ज्यांच्या जीवनातील सर्वोच्च त्यागाचा क्षण असतो, अशा भारतीय सैन्य दलातील ‘पारा स्पेशल फोर्सेस आापरेटिव्हज’मधल्या अनाम व अप्रसिद्ध अधिकारी तसेच जवानांच्या असीम शौर्याच्या, त्यागाच्या सत्यकथा म्हणजे लेखिका स्वप्नील पांडे यांचे ‘बलिदान’ हे लक्षणीय पुस्तक. पाराशूट रेजिमेंट हा भारतीय सेनेचा हवाई विभाग असून ती पायदळाची शाखा आहे. स्पेशल फोर्सेसच्या मोहिमा विशिष्ट लक्ष्यांवर थेट हल्ला, विशिष्ट हेरगिरी, अपारंपरिक युद्धकौशल्य, दहशतवाद, परकीय देशाच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी या पाच क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात. मात्र या मोहिमांमध्ये सामील असणाऱया धैर्यवान आणि साहसी वीरांची नावे कधीही प्रकाशात येत नाहीत. युद्ध मोहिमेवरच नव्हे तर इतर वेळेही त्यांना सांकेतिक नावानेच ओळखले जाते. त्यांची ओळख पटू नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते. ‘बलिदान बाज’च्या अत्यंत महत्त्वाच्या पाच अधिकाऱयांवर अत्युच्च पर्वतराशीवरील सीमारेषांचे संरक्षण आणि अतिरेकी दहशतवादाचे उच्चाटन या अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाऱया सोपवलेल्या असतात. या शूर तरीही अनाम, अप्रसिद्ध योद्धांना प्रकाशझोतात आणणे हे या लेखनामागील लेखिकेचे उद्दिष्ट आहे. लेखिकेने या पूर्वीही ‘द फोर्स बिहाइंड द फोर्सेस’, ‘लव्ह स्टोरी आाफ कमांडो’, ‘सोल्जर्स गर्ल’ ही पुस्तके विस्तृत संशोधन करून भारतीय सैनिक व त्यांच्या परिवाराचे कार्य आणि जीवनपद्धतीची जाणीव लोकांना व्हावी या उद्देशाने लिहिली आहेत. ‘बलिदान’ या संग्रहात कर्नल संतोष महाडिक, पाप्टन तुषार महाजन, ब्रिगेडियर सौरभ सिंग शेखावत, सुभेदार मेजर महेंद्र सिंग या प्रमुख वीरांसह मेजर मनीष सिंग, सुभेदार संजीव कुमार, पाराट्रूपर छत्रपाल बालकिशन, अमित कुमार तसेच अनेक साहसी वीरांच्या पराक्रमाबद्दलही लिहिले आहे. हे वाचताना आपल्या सर्वस्वावर पाणी सोडून, साऱया इच्छा आकांक्षा, सुखस्वप्नांचा त्याग करून देशासाठी मृत्यूला कवटाळायला निघालेल्या अशा अनाम वीरांबद्दल कृतज्ञतेची, सहानुभूतीची आणि अभिमानाची भावना दाटून आली नाही तरच नवल! त्यातही सातारा जिल्हय़ातील पोगरवाडी या लहानशा खेडय़ात सामान्य कुटुंबातील संतोष महाडिक याची शौर्यगाथा तर हृदयाला भिडणारी आहे. संतोषशी लग्न करून स्वस्थ न बसता पत्नी लष्करी शिक्षण घेऊन लेफ्टनंट स्वाती महाडिक बनते. या दोघांचा सहजीवनाचा प्रवासही विलक्षण रोमांचकारी. पतीच्या बलिदानानंतर आपले सर्वस्व लष्करी सेवेसाठी वेचणारी अशी स्त्री म्हणजे असीम त्यागाचा परमोच्च बिंदू!
शत्रुशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱयांच्या शौर्यगाथा यात आहेत. लेखिकेने एक वर्षाच्या कालावधीत पराक्रमी सैनिकांच्या मित्र आणि कुटुंबिय तसेच स्पेशल फोर्सेसच्या युनिटना भेटी देऊन माहिती मिळवली आहे. उल्का राऊत यांनी मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. या साहसवीरांची रंगीत छायाचित्रेही सोबत आहेत. अनाम वीरांची ही शौर्यगाथा नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
बलिदान
लेखक : स्वप्नील पांडे अनुवाद : उल्का राऊत
प्रकाशक : साकेत प्रकाशन
पृष्ठे : 232 मूल्य : रु. 299/-