आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना सर्व शासकीय रुग्णालयांत लागू आहेत. या योजना राज्यातील नोंदणीपृत सर्व खासगी रुग्णालयांत लागू केल्यास खऱ्या अर्थाने बहुसंख्य गरीब व गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे या दोन्ही योजना सरसकट सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते, मुख्य प्रतोद-आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकार महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र सरकारची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गेल्या चार वर्षांपासून राबवत आहेत. दोन्ही योजना मिळून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. यात 360 नवीन उपचारांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 1 हजार 356 उपचारांपैकी 199 उपचार सरकारी रुग्णालयात करता येणार आहेत. सध्या या योजना राज्यातील 55 सरकारी आणि 83 खासगी रुग्णालयांत लागू आहेत; परंतु या योजना बहुतांश खासगी रुग्णालयांत लागू नसल्याने राज्यातील अनेक गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नसून या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे अनेक वेळा रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही योजना सरसकट सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये लागू करा, अशी मागणी सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.