भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम होणार सुरू, जोगेश्वरीकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

जोगेश्वरी पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील स्टेशनकडे जाणाऱ्या भुयारी मार्ग रुंदीकरणाचे काम वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडले होते. यासंदर्भात शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून लवकरच हे काम पूर्ण होऊन जोगेश्वरीकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे.

जोगेश्वरी पूर्व जनता काॅलनी, संजय गांधी नगर येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्ग रुंदीकरणाचे कामास वाहतूक विभागाची परवानगी मिळण्यासंदर्भात स्थानिक शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी आज वाहतूक सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांची भेट घेतली. भुयारी मार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करून लवकरच कामासाठी परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन कुंभारे यांनी दिले. यावेळी जोगेश्वरी विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, व्यापार विभाग अध्यक्ष संजय सावंत आदी यावेळी उपस्थित होते.

  • जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शन ते राज्य राखीव पोलीस बल दल गेट गोरेगाव पूर्व येथील भूमिगत नाल्याचे कामही वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याने बंद आहे. सदरच्या कामालाही परवानगी देण्यात आली असून ते लवकरच सुरू होईल, असे आमदार बाळा नर यांनी सांगितले.