धस यांच्या आरोपांची दखल, 73 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती

धनंजय मुंडे यांच्या बेबंद कारभाराला अखेर अजित पवारांनी वेसण घालण्याचा निर्णय घेतला. कोणतेही काम न करता 73 कोटी रुपयांची बोगस बिले उचलण्यात आल्याचे प्रकरण गांभीर्याने घेत अजितदादांनी या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी धाराशीवच्या उपजिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून एका आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश या समितीला दिले आहेत.

नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री अजित पवार नुकतेच बीडमध्ये आले होते. बैठकीच्या अगोदरच आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोणतेही काम न करता 73 कोटी रुपयांची बोगस बिले उचलण्यात आल्याचा बॉम्बगोळा टाकला होता. या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे असलेला पेन ड्राइव्हही त्यांनी अजितदादांकडे दिला होता.

मारेकरी काय साधूसंत नव्हते… धनंजय देशमुख संतापले

एक चापट मारली म्हणून त्याच्या बदल्यात दहा चापटा मारल्या असत्या तरी चालले असते, पण चापट मारली म्हणून अमानुष खून करणे हा कोणता न्याय आहे, अशा शब्दांत धनंजय देशमुख यांनी नामदेवशास्त्री यांच्या प्रतिक्रियेवर आपला संताप व्यक्त केला. ते मानसिकतेबद्दल बोलले आहेत. आज आमची काय मानसिकता आहे याची त्यांना कल्पना आहे का, याचे उत्तर नामदेवशास्त्रीकडून अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

वाळूमाफियांशी लागेबांधे; दोन पोलीस निलंबित

पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी अवैध धंद्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतरही काही पोलीस कर्मचारी अवैध धंद्यांशी लागेबांधे ठेवून आर्थिक उलाढाल करत आहेत. यात गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांनी वाळूत तडजोड करून आपला आर्थिक फायदा साधल्याने पोलीस अधीक्षकांनी या दोघांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे पुन्हा एकदा गोदा पट्टा चर्चेत आला आहे.