दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी आज राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी एक आठवडय़ापेक्षा कमी कालावधी उरला आहे. 2025च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे सात आमदारांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. काही आमदारांनी त्यांचे राजीनामे सोशल मीडियावर शेअर केले.
राजीनामा देणाऱ्या ‘आप’ आमदारांमध्ये भावना गौर (पालम), नरेश यादव (मेहरौली), राजेश ऋषी (जनकपुरी), भूपिंदर सिंग जून (बिजवासन), मदन लाल (कस्तुरबा नगर), रोहित मेहरौलिया (त्रिलोकपुरी) आणि पवन शर्मा (आदर्श नगर) यांचा समावेश आहे.
दरम्यान, सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या नरेश यादव यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. मात्र एका प्रकरणातील त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर नरेश यादव यांनी स्वतःहून तिकीट परत केले. त्यानंतर ‘आप’ने मेहरौलीमधून दुसरा उमेदवार उभा केला.