लोकलमधील बिघाडाने पश्चिम रेल्वे कोलमडली; जवळपास 20 मिनिटे सेवा ठप्प

पश्चिम रेल्वे मार्गावर शुक्रवारी दुपारी जवळपास 20 मिनिटे लोकल सेवा ठप्प झाली. महालक्ष्मी रेल्वे स्थानकादरम्यान एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्याचा परिणाम संपूर्ण सेवेवर झाला. लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांत गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांनी लोकलमधूल उतरून रुळावरूनच पायपीट सुरु केली. यादरम्यान सर्वच स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विरारवरून आलेली लोकल मुंबई सेंट्रल कारशेडच्या दिशेने जात होती. महालक्ष्मी स्थानकाजवळ त्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ती लोकल मधेच उभी राहिल्याने इतर गाडय़ांची वाट रोखली गेली. परिणामी, चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील लोकल सेवा जवळपास 20 मिनिटे पूर्णपणे ठप्प झाली.