Mahakumbh 2025 – ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी

महाकुंभमध्ये महामंडलेश्वर बनलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची अवघ्या काही दिवसातच या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ममताला महामंडलेश्वर बनवल्यानंतर किन्नर आखाडय़ात मोठा संघर्ष सुरू झाला होता. ममता कुलकर्णीसोबत लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून काढून टाकण्यात आले आहे. किन्नर आखाडय़ाचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केली आहे. मागील आठवडय़ात ममता कुलकर्णीने महाकुंभमध्ये पिंडदान करत संन्यास घेतला होता. त्यानंतर एका भव्य पट्टाभिषेक कार्यक्रमात तिला किन्नर आखाडय़ाचे महामंडलेश्वर बनवण्यात आले होते. महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता कुलकर्णीला श्री यमाई ममता नंदगिरी असे नाव देण्यात आले होते. मात्र या सर्व घटनेवरून इतर साधुसंतांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच ममता कुलकर्णी हिने महामंडलेश्वर बनल्यानंतर डोक्याचे मुंडणसुद्धा केले नव्हते. त्यावरून अनेक साधुसंतांमध्ये नाराजी पसरली होती.

महामंडलेश्वरची उपाधी कुणालाही नाही

लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सनातन धर्म आणि देशहिताचा विचार सोडून ममता कुलकर्णीसारख्या नटीला, जी फिल्म आणि ग्लॅमरशी जोडलेली आहे, तिला कोणत्याही धार्मिक आणि आखाडय़ाची परंपरा मानत वैराग्याच्या दिशेने जाऊ देण्याऐवजी थेट महामंडलेश्वरची उपाधी दिली. तिचा पट्टाभिषेक केला हे योग्य नाही, असा गंभीर आरोप ऋषी अजय दास यांनी केलाय. ‘‘23 वर्षांच्या आध्यात्मिक प्रवासानंतर अशा आखाडय़ाचं महामंडलेश्वर बनणं म्हणजे मला जणू ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखं वाटतंय’’, अशी प्रतिक्रिया ममताने दिली होती.