Mahakumbh 2025 – महाकुंभसाठी इंडिगोचे तिकीट स्वस्त

महाकुंभसाठी जगभरातील भाविक उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पोहोचत आहेत. परंतु, विमान कंपन्यांनी या ठिकाणी जाणाऱ्या विमान तिकिटात अवाचेसवा दरवाढ केल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती. यावरून नागरिक उड्डाण मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावून विमान कंपन्यांना आपले तिकीट दर कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे इंडिगो विमान कंपनीने तातडीने आपल्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयागराजला जाणाऱ्या फ्लाईटच्या दरात इंडिगोने 30 टक्के ते 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे इंडिगोकडून सांगण्यात आले आहे. इंडिगोच्या या निर्णयामुळे हजारो ग्राहकांना फायदा होईल.

26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ

प्रयागराज येथे महाकुंभमेळा 13 जानेवारीपासून सुरू झाला आहे. 26 फेब्रुवारीला हा मेळा संपणार आहे. आतापर्यंत महाकुंभला भेट देणाऱ्यांची संख्या 15 कोटींहून अधिक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 26 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 45 कोटी लोक महाकुंभला भेट देतील, असे बोलले जात आहे.

एक तिकीट 50 हजाराला

प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटाचे दर प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आले. केवळ मौनी अमावास्येला म्हणजेच 29 जानेवारी रोजी दिल्ली ते प्रयागराज या प्रवासासाठी तिकीट दर चार पट वाढवण्यात आले होते. एका तिकिटाची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. अनेक प्रवाशांनी तिकिटाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करून नाराजी व्यक्त केली होती. 28 जानेवारीला सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत 41 हजार रुपये इतकी होती.