राज ठाकरे हे सध्या यक्षाच्या भूमिकेत विधानसभा निवडणूक निकालासंदर्भातील प्रश्नांची भेंडोळी घेऊन उभे असले तरी फडणवीस, अमित शहा किंवा भारताचा निवडणूक आयोग म्हणजे धर्मराज युधिष्ठर नाहीत. यक्षाने युधिष्ठरास एकूण 125 प्रश्न विचारले, पण सध्याच्या यक्ष महाराजांनी फडणवीसांना एकच प्रश्न विचारला, ‘तुमचा विजय खरा आहे काय? आमची मते गेली कोठे?’ यक्षाच्या 125 प्रश्नांच्या बरोबरीचा हा एकच प्रश्न आहे.
आपल्या देशातील निवडणूक व निवडणूक यंत्रणा राबविणारी व्यवस्था म्हणजे लुटारूंच्या टोळ्याच झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाशी विशेष सख्य असलेले ‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांवर अचानक संशय व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची भूमिका होती, आता फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी महाराष्ट्राच्या एकंदरीत निकालांवर राज यांनी आक्षेप घेतला आहे. फडणवीस व त्यांचे लोक हे ‘ईव्हीएम’ घोटाळा करूनच सत्तेवर आले आहेत व ते सर्वस्वी बेकायदेशीर असल्याचे राज ठाकरे सांगत आहेत. भाजपने महाराष्ट्राचे राजकारण घाणेरड्या पातळीवर नेऊन ठेवले. माणसे फोडणे व आपल्या दावणीला बांधणे हे त्यांचे मुख्य ध्येय झाले आहे. मतविभागणी करून ठिकठिकाणी विजयी होणे हे त्यांचे डावपेच असतात. मराठी माणसांची मते विभागण्यासाठी ‘मनसे’ व दलितांची मते तोडण्यासाठी ‘वंचित’चा बेमालूम वापर केला जातो. या दोघांच्या मदतीने फडणवीस, अमित शहा आपला डाव महाराष्ट्रात साधून घेतात व हे काही लपून राहिलेले नाही. आश्चर्य असे की, वंचितचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर हेदेखील निवडणूक निकालांनंतर ‘ईव्हीएम’वर तुटून पडले व आता बरेच दिवस विचार केल्यावर राज ठाकरे यांनीही ‘ईव्हीएम’ निकाल खरा नसल्याचे जाहीर केले. लोकांनी मते दिली ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाहीत. म्हणजे ईव्हीएमवर ज्यांच्या चिन्हापुढे मतदारांनी बटण दाबले, त्यांच्यापर्यंत मते गेली नाहीत. मग या अदृश्य झालेल्या मतांचे नक्की काय झाले? हा महाराष्ट्राला पडलेला गहन प्रश्न आहे. राज यांच्या मनात ही अशी शंका घुसळत असेल तर त्यांनी सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाच मागायला हवा. अदृश्य झालेल्या मतांची हेराफेरी करून महाराष्ट्रात भाजप व त्यांचे लोक सत्तेवर आले आहेत. त्या सगळय़ाचे
सूत्रधार श्री. फडणवीस हेच
आहेत. त्यामुळे राज्यात ‘ईव्हीएम’विरोधात लढाई तर सुरूच आहे. महाराष्ट्राच्या निकालानंतर जनता अनेक ठिकाणी रस्त्यावर आली. माळशिरस विधानसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाचे उत्तम जानकर निवडून आले, पण या जिंकलेल्या आमदारासही वाटते की, मला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. मतदानाच्या मशीनमध्ये नक्कीच घोटाळा आहे. मारकडवाडी या गावात आपल्याला सर्वाधिक मतदान व्हायलाच हवे होते. ते का झाले नाही? या प्रश्नावर मारकडवाडीचेच लोक मतपत्रिकेवर निवडणुका घ्या म्हणून रस्त्यावर उतरले. धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना त्यांच्याच गावात म्हणे शून्य मते मिळाली. त्या गावचे मतदारही कुणाल पाटील यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. राज यांनी त्यांच्या एकमेव आमदाराच्या गावातील मतदान कसे झाले ते सांगितले. माजी आमदार राजू पाटील यांच्या गावात 1400 मतदान आहे. पाटील यांना त्यांच्या स्वतःच्याच गावात एकही मत पडले नाही. हे शक्य आहे काय? असा प्रश्न राज यांना पडला. या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर त्यांनी भाजपातील त्यांच्या मित्रांशी खासगी गुफ्तगू करायला हवे. महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील सर्वच निवडणुका भाजप अशाच पद्धतीने जिंकत आहे. त्यामुळे लोकांत एक प्रकारची घबराट व अस्वस्थता दिसत आहे. एका बाजूला पैसा व दुसऱ्या बाजूला हॅक केलेल्या ईव्हीएम अशा कात्रीत आपली संसदीय लोकशाही सापडली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे लोक यापुढे निवडणूक लढवू शकतील काय? तरुण कार्यकर्ते निवडणुकांपासून दूर पळतील व भाजप ईव्हीएमच्या युतीने एकतर्फी निवडून येईल. ईव्हीएम घोटाळय़ामुळे भारतीय निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या नावाने सुरू झालेला एक ‘फार्स’ ठरत आहे. बाळासाहेब थोरातांसारखा मोहरा पराभूत होईलच कसा? हा राज यांनी उपस्थित
केलेला प्रश्न योग्यच
आहे. एकमेव खासदार असलेल्या अजित पवारांचे 42 आमदार कसे काय? किंवा 8 खासदार असलेल्या शरद पवारांना फक्त 10 आमदार? हे प्रश्न जनतेच्या मनातले, पण बराच काळ विचार केल्यानंतर हेच प्रश्न राज ठाकरे यांनाही पडले आहेत. राज ठाकरे यांना निवडणूक निकालाबाबत पडलेले प्रश्न हे महाभारतातील यक्षप्रश्नांप्रमाणे आहेत. महाभारतातील युधिष्ठर आणि यक्ष यांच्यातील प्रश्न-उत्तरे आणि संवाद जितका मोहक आहे तितकेच राज यांना पडलेले प्रश्न व त्या प्रश्नांना फडणवीसांकडून मिळणारे उत्तरही कदाचित रंजक असेल. या उत्तर-संवादाची वाट महाराष्ट्रदेखील पाहत आहे. राज हे यक्षाच्या भूमिकेत आहेत की युधिष्ठराच्या, हे याक्षणी कळायला मार्ग नाही. पाणी पिण्यासाठी जंगलातील एका तळय़ापाशी गेलेले नकुल, सहदेव, भीम, अर्जुन हे यक्षाने केलेल्या सूचना न ऐकल्यामुळे जागेवरच मृत्युमुखी पडले. मात्र युधिष्ठराने यक्षाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व आपल्या भावांना जिवंत केले, त्याप्रमाणे भाजपने मृत केलेली लोकशाही कोणी जिवंत करणार आहेत काय? राज यांना प्रश्न पडले आहेत. त्यांना उत्तराची अपेक्षा आहे. राज ठाकरे हे सध्या यक्षाच्या भूमिकेत विधानसभा निवडणूक निकालासंदर्भातील प्रश्नांची भेंडोळी घेऊन उभे असले तरी फडणवीस, अमित शहा किंवा भारताचा निवडणूक आयोग म्हणजे धर्मराज युधिष्ठर नाहीत. यक्षाने युधिष्ठरास एकूण 125 प्रश्न विचारले, पण सध्याच्या यक्ष महाराजांनी फडणवीसांना एकच प्रश्न विचारला, ‘तुमचा विजय खरा आहे काय? आमची मते गेली कोठे?’ यक्षाच्या 125 प्रश्नांच्या बरोबरीचा हा एकच प्रश्न आहे.