>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
सीमा भागात घडलेल्या शौर्य आणि बलिदानाच्या कथा ऐकण्याच्या आणि साक्षीदार होण्याची संधी आता आम जनतेला उपलब्ध आहे. कारण केंद्र सरकारने ‘युद्धभूमी पर्यटना’ला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचे धोरण अवलंबले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आतापर्यंत भारतीय नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहन दिले जात नव्हते. मात्र आता त्यांना सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधण्याची आणि सीमेवरील त्यांच्या बलिदानाबद्दल प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळेल.
केंद्र सरकारने सध्या युद्धभूमी पर्यटन मोठय़ा प्रमाणामध्ये सुरू केले आहे. कारगीलची युद्धभूमी आपण द्रासला जाऊन बघू शकतो. याशिवाय लडाखमध्ये चिनी सीमेपर्यंत पर्यटकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता ‘आर्मी डे’च्या निमित्ताने 15 जानेवारीला सरकारने युद्धभूमी पर्यटन मोठय़ा प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता एक मोठे संकेतस्थळ आणि अॅप तयार करण्यात आले आहे, जिथून आपल्याला संपूर्ण रणभूमीविषयी माहिती मिळू शकेल. या पोर्टलमध्ये प्रसिद्ध युद्धभूमी आणि युद्ध स्मारकांना कशी भेट द्यायची, तिथे जायचे कसे, कुठे थांबायचे वगैरे, पर्यटक ‘भारत रणभूमी दर्शन’ वेबसाइट आणि अॅपवर अर्ज करण्यासह प्रवासाशी संबंधित सर्व व्यवस्था आहे.
युद्धभूमी पर्यटनासाठीच्या प्रदेशांमध्ये अरुणाचल प्रदेशातील किबिथू (वालॉन्गच्या लढाईसाठी) आणि बुमला, लडाखमधील रेझांगला, पँगाँग त्सो आणि गलवान आणि सिक्कीममधील चोला आणि डोकलाम यांचा समावेश आहे. कारगील किंवा द्रासमधील काही जागा गिर्यारोहकांसाठीदेखील खुल्या केल्या जाऊ शकतात, जेणेकरून कारगील युद्धाच्या लढाया ज्या उंचीवर लढल्या गेल्या, त्या उंचीचा अनुभव घेता येईल. गलवान, कारगील आणि सियाचीनची बर्फाळ युद्धभूमी असो किंवा थरच्या वाळवंटातील उष्ण भागात लढलेल्या लढाया असोत, पर्यटक आता युद्धक्षेत्रांचा अनुभव स्वतः घेऊ शकतात. जून 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या प्राणघातक संघर्षाचे ठिकाण पर्यटक आता स्वतः पाहू शकतात.
सिक्कीममधील नाथुला आणि झेमिथांगसह अरुणाचलची काही ठिकाणे पर्यटनासाठी आधीच खुली आहेत. ‘भारत रणभूमी दर्शन’ या प्रयत्नाचा भाग म्हणून ऐतिहासिक आणि दुर्गम युद्धक्षेत्रांचे पर्यटनस्थळांमध्ये रूपांतर होत आहे. जून 2017 च्या सुरुवातीला भारत आणि चीन यांच्यात डोकलाममध्ये दोन महिने संघर्ष झाला होता. जगातील सर्वात उंच आणि सर्वात थंड युद्धभूमी असलेले सियाचीन ग्लेशियर आणि 1999 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या संघर्षाचे ठिकाण असलेले कश्मीरमधील कारगील हे भारतासाठी मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. तेदेखील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. पर्यटक सियाचीन बेस कॅम्पपासून (12,000 फूट) 15 हजार फूट उंचीपर्यंतच्या परिसरात प्रवास करू शकतात, ज्यामुळे आपले सैनिक अत्यंत कठीण परिस्थितीत काम करतात, त्या कठीण भूगोलाचे जवळून निरीक्षण करता येते. अलीकडच्या वर्षांत सीमावर्ती पायाभूत सुविधांना चालना दिल्याने पर्यटन शक्य झाले आहे. साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल भारत सरकारला पूर्ण श्रेय देणे जरुरी आहे.
भारत-चीन सीमेवर एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) विकसित न करण्याच्या पूर्वीच्या मानसिकतेवर आणि अडचणींवर मात करून भारत सरकारने गेल्या 10 वर्षांत एलएसीच्या पायाभूत सुविधांचे जाळे मोठय़ा प्रमाणात विस्तारले आहे/ सुधारले आहे. गलवानपासून एलएसी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अधिक पूल आणि बोगदे बांधण्यात आले आहेत. रेल्वेची पायाभूत सुविधांमध्येही लक्षणीय वाढ आहे.
सीमावर्ती भागात लोकसंख्या हिमाचल, उत्तराखंडमध्ये कमी होत आहे. लष्करप्रमुखांनी सांगितले होते की, सीमावर्ती भागात आदर्श गावे बांधण्यात तसेच पायाभूत सुविधा विकसित करण्यात लष्कराचे योगदान मोठे आहे. यापूर्वी 2023 मध्ये केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि लडाख या राज्यांमधील 19 जिह्यांमधील उत्तरेकडील सीमेला लागून असलेल्या 46 ब्लॉकमधील निवडक गावांच्या व्यापक विकासासाठी ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम’ सुरू केला होता. त्यामुळे सीमावर्ती भागातील स्थानिक सांस्कृतिक आणि पारंपरिक ज्ञान बाकीच्या राज्यात पसरेल. रोजगाराच्या संधी पुन्हा निर्माण करण्यासाठी युद्धभूमी पर्यटन हा एक पर्याय आहे. बहुतेक सीमावर्ती भागात असलेल्या लढाऊ क्षेत्रांचे पर्यटन केंद्रांमध्ये रूपांतर केल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. त्यामुळे स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे आणि स्थानिक समुदायांना व्यवसाय करण्यास आकर्षित केले आहे. आता दूरच्या पर्वतीय भागातील स्थानिक लोक वेगळे वाटणार नाहीत आणि राष्ट्रीय मुख्य प्रवाहाशी त्यांचा संपर्क होईल.
सीमावर्ती भागात नागरिकांची उपस्थिती वाढणे हा एक मोठा फायदा असेल. कारण तेथील नागरिक सैन्याचे आणि देशाचे कान आणि डोळे बनतील. सरकार दुर्गम गावांमध्ये होम स्टे बांधण्याचादेखील प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय सुरक्षा वाढविण्यात गावातील रहिवाशांना सहभागी करून घेण्याचे फायदे अनेक आहेत. गावकऱयांना भूभाग माहीत आहे आणि ते घुसखोरांना आणि शत्रूच्या इतर बेकायदेशीर कृत्यांना ओळखण्यास सक्षम आहेत. कारगीलमध्ये घुसखोरांना प्रथम ओळखणारे मेंढपाळ होते. ‘रणभूमी दर्शन’मुळे सैन्याच्या इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि देशभक्ती जागृत होईल.