युजवेंद्र चहलने झारा यास्मिनला इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये केले होते प्रपोज? अभिनेत्रीने केला खुलासा

हिंदुस्थानचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेत असल्याची बातमी अलिकडेच समोर आली होती. त्यानंतर तो आरजे मेहविश हिला डेट करत असल्याच्या अफवानांही पेव फुटले होते. अशातच युजवेंद्र चहलचे एक जुने प्रकरण समोर आले आहे. यामध्ये चहलने अभिनेत्री झारा यास्मिनला इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये प्रपोज केले होते. याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

झाराने तिच्या आणि चहलमध्ये असलेल्या नात्याबाबत मोकळेपणाने भाष्य केले आहे. तिने दोघांच्या नात्याच्या बातम्या अफवा असल्याचे सांगितले. एका मुलाखतीत झाराने सांगितले आहे की, कोविडच्या काळात दोघांमध्ये अचानक चॅट प्लॅन झाला. यादरम्यान चहल तिला विचारत होता की, ती जेवणाचे कसे काय मॅनेज करते, कारण लॉकडाऊनमुळे मोलकरणीची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. तेव्हाच त्याने झाराला तो कधीही लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित करू शकतो, असे सांगितले होते. पण त्यावेळी त्याने कोणाचेही नाव घेतले नसले तरी यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. याचं दोघांनाही आश्चर्य वाटले होते, असे ती म्हणाली.

झारा पुढे म्हणाली, चहलने मला प्रपोज केल्याच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. कोविडच्या काळात झारा आणि चहल यांनी इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट केले होते. तेव्हापासून दोघेही चर्चेत आले. चॅट दरम्यान चहलने तिला प्रपोज केले होते, असा दावा माध्यमांनी केला होता. मात्र, झाराने ही गोष्ट खोटी असल्याचे सांगितले आहे. धनश्री वर्माला भेटण्यापूर्वी ही घटना घडली. या घटनेनंतर काही महिन्यांतच चहलने धनश्रीशी लग्न केले. धनश्री वर्मापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युजवेंद्र चहलचे नाव आरजे मेहविशसोबत जोडले जाऊ लागले. दोघेही मुंबईतील जुहू येथे एकत्र दिसले होते. ख्रिसमसच्या दिवशीही दोघे एकत्र पार्टी करताना दिसले. मात्र, यानंतर मेहविशने नाराजी व्यक्त करत आपण अशा गोष्टी अजिबात सहन करणार नसल्याची ताकीदच दिली होती.