MPSC च्या प्रश्नपत्रिका सुरक्षित; परीक्षा वेळापत्रकानुसारच, सोशल मीडियावरील रेकॉर्डिंगवर विश्वास ठेवू नका, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्पष्टीकरण

40 लाख रुपये द्या, तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देतो, असे आमिष काही समाजकंटकांकडून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना दाखवले जात आहे. या आमिषाचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असले तरी उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. हा सायबर फ्रॉडचा एक भाग आहे. येत्या रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित आहेत. उमेदवारांना प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवणाऱ्यांच्या विरोधात पुणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने आज देण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र गट-व सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा येत्या रविवारी राज्यभरातील 869 केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी 2 लाख 86 हजार उमेदवार बसले आहेत. या परीक्षार्थिना काही समाजकंटकांनी व्हॉट्सअॅप कॉल करून प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवले. त्या बदल्यात त्यांनी परीक्षार्थीकडे 40 ते 45 लाख रुपयांची मागणी केली. समाजकंटक आणि परीक्षार्थी यांचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक परीक्षार्थिनी आयोगाकडे तक्रार केली.

> आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये रविवारी होणाऱ्या परीक्षेबाबत स्पष्टीकरण दिले. रविवारी होणाऱ्या परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही. सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित आहेत.

> परीक्षा अत्यंत कडक वातावरणात आहेत. त्यामुळे उमेदवारांनी कोणतीही काळजी करू नये. ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहनही सुवर्णा खरात यांनी केले आहे.

जाहिरातीला नऊ महिने विलंब

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी सर्वाधिक पदे गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात. त्यामुळे या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते. विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत असतात. मात्र यंदा या परीक्षेची जाहिरात येण्यास तब्बल नऊ महिने विलंब झाला आणि त्याचा फटका सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांना बसला, या परीक्षार्थिनी परीक्षेसाठी वयोमर्यादा दोन वर्षे शिथिल करण्यात यावी, अशी मागणीही आयोगाकडे केली. त्यानुसार आयोगाने 5 जानेवारीला होणारी ही परीक्षा पुढे ढकलली. नव्याने अर्ज केलेल्या उमेदवारांना या परीक्षेसाठी संधी देण्यात आली. या उमेदवारांना अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणच्या उपकेंद्रांवरच परीक्षा देता येणार आहे.

पुणे पोलिसांत गुन्हा दाखल

अज्ञात समाजकंटकाने एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांना कॉल करून प्रश्नपत्रिका देतो असे सांगून 40 ते 45 लाख रुपयांची मागणी केली आहे. बहुतेक जणांना एकाच नंबरवरून कॉल गेले आहेत. याप्रकरणी आयोगाच्या वतीने पुणे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून त्यानुसार गुन्हाही दाखल झालेला आहे. हा प्रकार सायबर फ्रॉडचाच एक भाग आहे, असेही सुवर्णा खरात यांनी यावेळी स्पष्ट केले.