Maruti Suzuki e Vitara ची बुकिंग सुरू, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2025 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा सादर केली. कॉम्पॅक्ट आकार आणि लांबलचक असल्यामुळे ही कार लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. यातच ई-विटाराची बुकिंग सुरू झाली आहे, अशी माहिती समोर येत आहे. ग्राहक 25,000 रुपये टोकन रक्कम भरून ही कार बुक करू शकतात. मात्र बुकिंग फक्त डीलरशिपकडेच केली जात आहे, कंपनीकडून अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. तुम्ही e Vitara खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या Nexa डीलरशी संपर्क साधू शकता. यातच याचे फीचर्स, रेंज आणि किंमत जाणून घेऊ..

फीचर्स

नवीन ई-विटारा नेक्सा ब्लू, ग्रँड्युअर ग्रे, स्प्लेंडिड सिल्व्हर, आर्क्टिक व्हाईट, ऑप्युलंट रेड आणि ब्लूश ब्लॅक सिंगल-टोन विथ स्प्लेंडिड सिल्व्हर, ऑप्युलंट रेड, आर्क्टिक व्हाइट आणि लँड ब्रीझ ग्रीन ड्युअल-टोन रंगांमध्ये ब्लूश ब्लॅक रूफसह ऑफर केली जात आहे. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार रंग निवडू शकतात.

यात R18 एरोडायनामिक अलॉय व्हील्स, एक पॉलिहेड्रल मस्क्यूलर स्टॅन्स आणि 3D बोनेटसह एक आकर्षक फ्रंट फॅसिआ मिळते. याशिवाय पुढच्या बाजूला एअर व्हेंट्स आहे. सुरक्षिततेसाठी यात 7 एअरबॅग, 360-डिग्री कॅमेरे आणि लेव्हल-2 ADAS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

नवीन ई विटारा एका नवीन प्युअर इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. यात 49kWh आणि 61kWh चा बॅटरी पॅक आहे, ज्याची रेंज 500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार बॅटरी पॅक निवडू शकतात. ई विटारा गुजरातच्या प्लांटमध्ये तयार केली जाईल, तेथून ती जपान, युरोपमध्ये निर्यात केली जाईल आणि नेक्साच्या आउटलेट्सद्वारे विकली जाईल. याची किंमत सुमारे 18 ते 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.