विद्यार्थ्याला धडक देऊन कार चालक सटकला, करी रोड उड्डाणपुलावर अपघात

करी रोड उड्डाणपुलावर आज सकाळी एका वेगन आर कारने समोरून येणाऱया दुचाकीस्वाराला धडक देऊन पळ काढला. यात दुचाकीस्वार रुपक विश्वास हा बीडीएसच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी जखमी झाल्याने त्यांच्यावर नायर इस्पितळात उपचार सुरू आहे. दरम्यान पोलिस कार चालकाचा शोध घेत आहेत. रुपक विश्वास हा आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास करीरोड उड्डाणपुलाजवळून जात असताना समोरून आलेल्या वेगन आर कारने त्याला धडक दिली. तसेच विश्वास याला मदत न करता चालकाने तेथून पोबारा केला. त्यानंतर जखमी झालेल्या विश्वास याला नायर इस्पितळात नेण्यात आले. विश्वासच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले. दरम्यान, याप्रकरणी संध्याकाळ पर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती. अखेर संध्याकाळी अपघाताबाबत तक्रार देताच ना मी जोशी मार्ग पोलिसांनी अपघाताची नोंद करून वेगन आर कार चालकाचा शोध सुरू केला आहे.

पोलीस लवकरच चालकाला पकडतील – आदित्य ठाकरे यांचे ट्विट

अपघाताबाबत डॉ. अभिनव वाघ यांनी ट्विट करत अपघाताची माहिती उघड केली. त्यानंतर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी त्या पोस्टवर रिट्विट करत मुंबई पोलीस लवकरच सहाय्य पुरवून त्या कार चालकाला पकडतील अशी अपेक्षा व्यक्त केली