कोकण रेल्वे कामगार सेनेचे सदस्यत्व मोहिमेत पुढचे पाऊल,‘क्यूआर कोड’मार्फत केली जाणार नोंदणी

कोकण रेल्वे मार्गावरील शिवसेनेच्या रेल कामगार सेनेने सदस्यत्व नोंदणीमध्ये पुढचे पाऊल टाकले आहे. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते-सचिव विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्याध्यक्ष संजय जोशी व सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे रेल कामगार सेना सदस्यत्व नोंदणी अभियानासाठी स्टेट बँकेकडून स्वतंत्र क्यूआर कोड मिळविण्यात आला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते क्यूआर कोडचे प्रकाशन करण्यात आले.

कोकण रेल्वे रेल कामगार सेनेने सदस्यत्व नोंदणी अभियानामध्ये ‘पॅशलेस इकाॅनोमी’चे समर्थन केले आहे. त्याच हेतूने ‘क्यूआर कोड’मार्फत सदस्य नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे. क्यूआर कोडच्या प्रकाशनप्रसंगी कोकण रेल्वे रेल कामगार सेनेचे सरचिटणीस राजू सुरती आणि नागराज उपस्थित होते. स्वतंत्र क्यूआर कोडमुळे कोकण रेल्वेवर सर्व रेल कामगार सेनेच्या सभासदांना सोयिस्कररीत्या रेल कामगार सेनेचे सदस्यत्व घेता येणार आहे. सदस्यत्व मोहिमेअंतर्गत येणारी सर्व फी रेल कामगार सेनेच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.