दिंडोशीतील प्राचीन वाघेश्वरी मंदिर पर्यटन स्थळ जाहीर करा! सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील वाघेश्वरी मंदिर या प्राचीन स्थळास पर्यटन स्थळ म्हणून जाहिर करावे आणि पायाभूत सुविधांचा विकास करावा, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

मालाड पूर्व पिंपरीपाडा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीजवळ वाघेश्वरी मातेचे प्राचीन मंदिर आहे. वाघेश्वरी मातेच्या प्राचीन मंदिरात संपूर्ण राज्यातून अनेक भक्तगण येतात. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचे हे पुलदैवत आहे. या मंदिराची पौराणिकदेखील अख्यायिका आहे, परंतु मंदिरात जाण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मंदिरात जाणारा रस्ता मातीचा असून हा रस्ता पादचाऱ्यांसह वाहनांना प्रवासासाठी योग्य नाही. मंदिराचा पूर्वेतिहास पाहता हे मंदिर परिसर पर्यटन म्हणून जाहीर करावे. त्यामुळे मंदिर परिसराचा विकास उत्तम प्रकारे होईल व नागरिकांना सेवासुविधा चांगल्या प्रकारे देता येईल, असे आमदार सुनील प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे.