चेंबूर-सुमननगर परिसरात गुरुवारी रात्री मेट्रोचा पिलर कोसळून दोन घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मेट्रो मार्गिकेचे काम करताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे या घटनेतून उघडकीस आले. चेंबूर परिसरात वडाळा ते कासारवडवलीपर्यंतच्या मेट्रो मार्गिका क्रमांक चारचे काम सुरु आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे कामगार काम करीत होते. याचदरम्यान अचानक मेट्रोचा निर्माणाधीन पिलर खाली कोसळला. घटनेचे वृत्त समजताच रहिवाशांच्या मदतीसाठी शिवसेना शाखा क्रमांक 155 चे शाखाप्रमुख अशोक वीर, युवासेना शाखाधिकारी निखिल भोईटे, युवासेना उपचिटणीस अविनाश गांगुर्डे, युवासेना शाखा समन्वयक सुयोग कटकधोंड, सुभाष पाटील, विष्णू शिवकर, चित्रेश कोठेकर यांनी धाव घेतली आणि स्थानिक रहिवाशांची विचारपूस केली. मेट्रोचे अधिकारी मात्र तातडीने घटनास्थळी आले नाहीत.