महाकुंभ मेळय़ात मौनी अमावास्येच्या पर्वासाठी देशभरातून दाखल झालेल्या कोट्यवधी भाविकांना चेंगराचेंगरीच्या संकटाचा सामना करावा लागला. त्यात 30 भाविकांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक भाविक जखमी झाले. या चेंगराचेंगरीनंतर दुर्घटनांची मालिका सुरूच असून आज महाकुंभ मेळय़ात भीषण आग लागल्याने भाविकांच्या काळजाचा पुन्हा ठोका चुकला. जुन्या आखाडय़ात आगीचा अक्षरशः भडका उडाला. आगीचे पचंड लोळ उडाले आणि 15 तंबू भस्मसात झाले. या घटनेमुळे चेंगराचेंगरीनंतर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या ढिसाळ नियोजनाचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
महाकुंभाचा सेक्टर 22, छतनाग घाट आणि झुशीच्या नागेश्वर घाटाच्या दरम्यान येतो. येथे अचानक आग लागली आणि क्षणार्धात 18 तंबू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्यानंतर भाविक आणि जुन्या आखाडय़ातील संत, महंत सतर्क झाले. त्यामुळे जीवितहानी टळली. आगीच्या घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कळू शकलेले नाही.
आग लागल्याचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे जवान वेळेवर घटना स्थळी पोहोचले असते तर मोठय़ा संख्येने तंबू जळाले नसते. ज्या भागात आग लागली तिथे पोहोचण्यास जागाच नव्हती. प्रशस्त असा मार्गच नसल्याने गाडय़ांना तिथे पोहोचण्यास उशीर झाल्याचे पोलीस अधिकारी प्रमोद शर्मा यांनी सांगितले.
सर्वेच्च न्यायालयात याचिका
चेंगराचेंगरीबाबत सर्वेच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून उत्तर प्रदेश सरकारकडून स्थिती अहवाल घ्यावा आणि जबाबदार अधिकाऱयांवर कारवाई व्हावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस व्यवस्था करावी, अशी विनंतीही याचिकेत केली आहे. अॅड. विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी न्यायिक आयोगाचे काम सुरू
चेंगरेंगरीवर न्यायिक आयोगाने आपले काम सुरू केले आहे. समितीचे तिन्ही सदस्य लखनऊच्या 10 जनपथ येथील कार्यालयात पोहोचले. या आयोगाचे अध्यक्ष अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हर्ष कुमार आहेत आणि त्यात माजी पोलीस महासंचालक व्ही.के. गुप्ता तसेच माजी आयएएस अधिकारी डी.के. सिंह यांचा समावेश आहे. एका महिन्यात आयोग आपला तपास अहवाल सरकारला सादर करणार आहे.
चेंगराचेंगरीनंतर तरुणाला हृदयविकाराचा झटका
चेंगराचेंगरीनंतर लोकांना 18 ते 20 किलोमीटर पायी चालावे लागले. यामुळे गाजीपूरमधील एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. ते खाली पडले. तेथून जाणाऱ्या लोकांनी त्यांना सीपीआर देऊन रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, संगम नदीच्या काठावर घोड्यांवर पोलीस गस्त घालत असून ते येणाऱ्या भाविकांना थांबू नका आणि पुढे जात राहा, असे सांगताना दिसत आहेत.
पोलीस निरीक्षकाने भाविकांच्या जेवणात टाकली वाळू
प्रयागराजच्या सोराव पोलीस स्टेशन परिसरात, पोलीस निरीक्षक ब्रजेश तिवारी यांनी भाविकांसाठी बनवल्या जाणाऱया अन्नात वाळू फेकून ते खराब केल्याची घटना घडली. महाकुंभात आलेल्या लोकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करणाऱ्यांचे प्रयत्न राजकीय वैमनस्यामुळे वाया जात आहेत हे दुर्दैवी आहे, असा आरोप या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर सपाचे नेते अखिलेश यादव यांनी एक्सवरून केला आहे.
अहिल्यानगरचे 150 भाविक प्रयागराजमध्ये अडकले; अन्न-पाण्याविना हाल
अहिल्यानगरमधील 150 भाविक अनेक तासांपासून प्रयागराज येथे वाहतूककोंडीत अडकले असून अन्न-पाण्याविना त्यांचे हाल होत आहेत. अहिल्यानगर तालुक्यातील जखणगावचे सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी प्रयागराज येथून विदारक परिस्थितीची माहिती दिली. डॉ. गंधे यांनी सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ पोस्ट करीत अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडे मदतीची विनंती केली आहे. जखणगाव व परिसरातील 150 भाविक खासगी आराम बसने 26 जानेवारीला अहिल्यानगरहून प्रयागराजकडे रवाना झाले. 29 रोजी मौनी अमावस्येला अमृतस्नान झाले. अहिल्यानगरचे सर्व भाविक सुखरूप आहेत, असे डॉ. सुनील गंधे यांनी म्हटले आहे.
अनेक जण बेपत्ता; सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप
मौनी अमावस्येच्या दिवशी संगम नदीकाठावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अनेक जण बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. बेपत्ता भाविकांचे नातेवाईक अतिशय भांबावलेल्या नजरेने त्यांचा शोध घेत आहेत. खोया-पाया सेंटरमध्ये त्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, जौनपूरमधील बदलापूरची रहिवाशी अशरफी देवी मंगशवारी महाकुंभ मेळ्याला आल्या होत्या. परंतु त्या त्यांच्या नातेवाईकांपासून वेगळ्या झाल्या. त्यानंतर कुटुंबियांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा पत्ता लागलेला नाही. दरम्यान, चेंगचेंगरीत मृत पावलेल्या भाविकांचा आकडा सरकार लपवत असल्याचा गंभीर आरोप सपाचे खासदार रामगोपाल यादव यांनी केला.
30 निष्पापांचे प्राण गेल्यानंतर योगी सरकारला जाग, व्हीव्हीआयपी पास रद्द; वाहनांना बंदी
चेंगराचेंगरीत 30 भाविकांचे प्राण गेल्यानंतर अखेर योगी सरकारला जाग आली आहे. सरकारने आज व्हीव्हीआयपी पास रद्द करण्याचे आणि कुंभ परिसरात वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले. या प्रकरणी योगी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्रयागराजलगतच्या जिल्ह्यांतून येणारी वाहने जिह्याच्या सीमेवरच थांबली जात असून शहरात चारचाकी वाहनांना 4 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशबंदी आहे. अनावश्यक थांबे टाळावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
– प्रयागराजहून परतीचे सर्व मार्ग खुले आणि विनाअडथळा सुरू ठेवण्याचे आदेश
– परिस्थितीचा अंदाज घेऊनच भाविकांना पुढे जाण्याची परवानगी द्यावी
– भाविक जिथे थांबतील तिथे अन्न आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी
– रस्त्यावरील फेरीवाल्यांना अन्यत्र हलवणार
प्रयागराजमध्ये 18 तास कोंडी
चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमध्ये गेल्या 18 तासांपासून भाविक वाहतूककाsंडीत अडकले असून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्याचा आरोप केला जात आहे.
योगी राजीनामा द्या, धर्मसंसदेत ठराव
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खोटारडे आहेत. सरकारने चेंगराचेंगरीत एकही मृत्यू झाला नसल्याचे सांगून आम्हाला अंधारात ठेवले. त्यामुळे महाकुंभ सुरू असतानाच त्यांनी राजीनामा द्यावा, असा प्रस्ताव शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद यांनी आज ठेवला. हा प्रस्ताव धर्मसंसदेत एकमताने मंजूर केला.