
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर येथील भाजप सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. राजकीय पक्षांपाठोपाठ आता संत-महंतांकडूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी उत्तर प्रदेशमधील सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हटलं आहे. ते म्हणाले आहेत की, ”मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळा संपण्याआधीच राजीनामा द्यायला हवा, कारण मुख्यमंत्री खोटारडे आहेत. आमच्यासोबत घडलेली दुर्दैवी घटना आमच्यापासूनच लपवत आहेत.”
शंकराचार्य म्हणाले की, ”हे सध्याच्या सरकारचं मोठं अपयश आहे. अशा सरकारला यापुढे सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, सरकारनं स्वतःहून पायउतार व्हावे किंवा जबाबदार लोकांनी यात हस्तक्षेप करावा. अशा या दु:खद घटनेनं सनातनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.”
ते पुढे म्हणाले, ”येत्या काही दिवसांत दररोज लाखो-कोटी भाविक येथे येणार आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आगामी काळात आणखी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी कठोर कारवाईची गरज आहे.”