प्रेम करण्याला ना वयाचे बंधन असते ना कोणती सीमा. याचा प्रत्यय नुकताच एका वृद्धाश्रमात आला. आसामच्या गुवाहाटी येथील एका वृद्धाश्रमात अशीच प्रेम कहानी फुलली. अखेर दोघांनीही उतार वयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. वराचे नाव पद्मेश्वर असून वय 71 वर्षे, तर वधूचे नाव जयप्रभा असून वय 65 वर्षे आहे. पद्मेश्वर आणि जयप्रभा हे दोघेही वृद्धाश्रमात राहत होते. याच ठिकाणी या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. जयप्रभा यांना गायनाची आवड आहे. वृद्धाश्रमात दाखल झाल्यानंतर त्या एक गाणे गुणगुणत होत्या. त्यांचा आवाज ऐकून पद्मेश्वर हे फिदा झाले. दोघे समोरासमोर आल्यानंतर त्यांच्या नात्यात घट्ट मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अखेर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचे धुमधडाक्यात लग्न लावून दिले. या विवाहाला 4 हजार जणांची उपस्थिती होती. हळद, मेहंदीसह संपूर्ण विवाह रीतिरिवाजाप्रमाणे पार पडला. या नवदांपत्यसाठी वृद्धाश्रमात एक वेगळी खोली दिली आहे.