हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विल्मोर मागील आठ महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. त्यांना पृथ्वीवर परत आणण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. मात्र त्यात यश आले नाही. या दोघांना परत आणण्यासाठी आता अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे एलॉन मस्क यांच्याकडे मदत मागितली आहे. ट्रम्प यांनी मस्कला दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याचे काम दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक महिन्यांपासून अडकलेल्या दोन अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्स लवकरच एक मोहीम सुरू करेल.’ स्पेसएक्सचे मस्क यांनी एक्सवर पोस्ट लिहित बायडन सरकारवर निशाणा साधला. मस्क यांनी म्हटलंय, ‘अंतराळवीरांना परत आणण्यासाठी आमच्याकडे मदत मागण्यात आलीय. नासाने त्यांच्या क्रू 9 मोहिमेंतर्गत दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सला काही महिने दिले होते. आम्ही त्यांना लवकरात लवकर पृथ्वीवर परत आणण्याचे प्रयत्न करू.’