सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, सुप्रिया सुळेंनी ठणकावलं

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजार वाढल्याने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी सकाळी नांदेड गावातील दूषित पाण्याच्या विहिरीची पाहणी केली. तसेच महापालिका अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले.

यावेळी बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबतही सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले. संदीप क्षीरसागर नमिता मुंदडा, सुरेश धस, सोलंकीजी हे सगळे बीडचे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी या सर्वांनी गेल्या 50 दिवसात अनेक आरोप प्रत्यारोप केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी याची नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मागणीही महाराष्ट्रातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे यांनी केली. आज योगायोगाने तिथली डीपीडीसी आहे. गेले 51 दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे? अशी गायब कशी होऊ शकते? पोलीस यंत्रणा काय करतेय? असे सवाल करत जोपर्यंत सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले. सर्व कागदपत्र अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. आणि उपमुख्यमंत्री म्हणाले मी सर्व कागदपत्रं मुख्यमंत्र्यांना देणार आहे. मुख्यमंत्री प्रचारासाठी दिल्लीला गेलेत.

भ्रष्टाचार, खंडणी, हत्या प्रकरणी न्याय मागणार

अर्थसंकल्पाच्या वेळी पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातील हे मुद्दे आम्ही महाविकास आघाडीचे सर्व खासदार महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत. महाराष्ट्रात ही जी हफ्तेबाजी, भ्रष्टाचार, खंडणी हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी संपूर्ण ताकदीनिशी माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत. भाजप आणि शिंदे साहेबांच्या खासदारांचीही भेट घेणार आहे. त्यांना विनंती करणार आहे, जसं महाराष्ट्रात सर्व पक्ष मिळून पूर्ण ताकदीने सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाच्या मागे उभे राहिलेत, माणुसकीच्या नात्याने आपले सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी संसदेत लढले पाहिजे. आपण अमित शाहजींची वेळ घेतली पाहिजे, माहिती दिली पाहिजे. अमित शाह यांना माहित नसेल महाराष्ट्रात काय चाललंय तर माहिती पाहिजे. मी स्वतः अमितजींची वेळ घेऊन सर्व खासदारांना घेऊन त्यांना या सर्व प्रकरणाची माहिती देणार आहे.

गेले 50 दिवस माझी, बंजरंग अप्पांची संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया यांची आमची सर्वांची एकच मागणी आहे, की एवढे आरोप झाल्यावर नैतिकतेवर निर्णय घ्यावा. अजित दादा सज्जड दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांना विचारा.

लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर ताशेरे

लाडकी बहीण योजनेत परराज्यातील महिलांनीही बनावट कागदपत्रे बनवून मोबदला घेण्यात आला. याबाबतही सुप्रिया सुळे यांनी सरकारला जबाब विचारला आहे. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सरकारच्या एजन्सीने भरून घेतले तर उत्तर सरकारने दिलं पाहिजे. त्या योजनेचं काय आहे. कधी 2100 रुपये देणार आहेत. जानेवारीपासून 2100 यायला पाहिजे होते, मग का आले नाहीत? अधिकाऱ्यांनी करोडो रुपये खर्च करून एवढे मोठे कार्यक्रम केले. राखी बांधून घेतली सर्वांकडून त्याचं पुढे काय झालं? हे पैसे परत घेण्यासाठी तुम्ही कार्यक्रम घेतले याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल.

दरम्यान, गोखले इन्सिट्यूट किंवा कुठल्यातरी अशा संस्थेने याचा अभ्यास करून सरकारला एक तातडीने रिपोर्ट देण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघातील उजनीचे धरण असेल, नीरा नदी असेल अनेक ठिकाणी प्रचंड प्रदूषण आहे. याबाबत गेली 10 वर्षे मी सातत्याने केंद्र सरकारला पत्र लिहिली आहेत. हा गंभीर विषय आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.