बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण, अनमोल बिष्णोईसह दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिष्णोई, शुभम लोणकर आणि यासिन अख्तर या तिघांविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने आज अजामीनपात्र वॉरंट जारी केले. वारंवार सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने आज विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले.

बाबा सिद्दिकी यांची काही महिन्यांपूर्वी वांद्रे येथे लॉरेन्स बिष्णोई टोळीने हत्या केली होती. या हत्या प्रकरणात 26 जणांना अटक करण्यात आली असून शुभम लोणकर, यासीन अख्तर आणि अनमोल बिष्णोई हे आरोपी पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत. तपास करणाऱया गुन्हे शाखेच्या पथकाने मकोका कोर्टात याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. वॉन्टेड आरोपींना अनेकदा समन्स पाठवूनही ते सुनावणीला गैरहजर राहत असल्याचे न्यायालयाने अखेर तिघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.