दादर-रत्नागिरी, दादर-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरु करण्यास चालढकल करणाऱया मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना बुधवारी शिवसेनेने स्मरणपत्र दिले. 9 जानेवारीला दिलेल्या आश्वासनानुसार दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या पॅसेंजर ट्रेन होळीपूर्वी सुरू करा, अन्यथा 1 मार्चला दादर स्थानकात ‘रेल रोको’ करू आणि दादरहून गोरखपूर, बलियाला जाणाऱया ट्रेन रोखू, असा खणखणीत इशारा रेल कामगार सेनेने मध्य रेल्वेला दिला.
मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून त्याजागी दादर- गोरखपूर आणि दादर-बलिया अशा गाडय़ा सुरू केल्या. त्यामुळे कोकणात जाणाऱया हजारो चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधत रेल कामगार सेनेने 9 जानेवारीला मध्य रेल्वे मुख्यालयाला धडक दिली होती. त्यावेळी मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी व दादर-सावंतवाडी पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार सुरु करण्याची विनंती मान्य केली होती, मात्र त्याला 19 दिवस उलटून गेले तरी दोन्ही पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. पॅसेंजर सुरू करण्यासाठी कोकणवासीय सातत्याने पाठपुरावा करीत आहेत, मात्र प्रशासनाकडून जाणूनबुजून दिरंगाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना नेते, सचिव आणि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक गोस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत महाव्यवस्थापकांना निवेदन दिले आणि दोन्ही पॅसेंजर तातडीने सुरू न केल्यास 1 मार्चला दादरहून सुटणाऱया गोरखपूर, बलियाच्या ट्रेन रोखू, असा इशारा स्मरणपत्राद्वारे दिला. यावेळी शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, शिवसेना आमदार सुनील शिंदे, शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 चे विभागप्रमुख संतोष शिंदे, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, कुलाबा विधानसभा प्रमुख विकास मयेकर, प्रमोद कासारे, अॅड. योगिता सावंत उपस्थित होते.